आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावचे सिंघम ईशूंच्या धडाकेबाज कार्याला निरुपम साथ; \'प्रेमविवाह की अरेंज, अजूनही संभ्रम\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धनाढय़, प्रभावशाली व्यक्तींना कायद्याची भीती नसते, असा सर्वसामान्यांचा समज, पण कायदा सर्वांसाठी सारखाच असतो, याची जाणीव करून देणारेही अधिकारी असतात. उत्तर प्रदेशातील मेरठचे सुपुत्र ईशू सिंधू त्यापैकीच एक. अवघ्या सहा वर्षांच्या काळात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. भुसावळ (जि. जळगाव) येथील अवैध धंद्याविरोधात केलेली बेधडक कारवाई, बड्या नेत्यांचा समावेश असलेल्या घरकुल घोटाळ्याचा तपास, यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली. शिस्तप्रिय, पण प्रेमळ, मितभाषी, संयमी असा त्यांचा स्वभाव असल्याचे निरुपमा सांगतात. राज्याचे माजी मुख्य सचिव जे. पी.डांगे यांच्या कन्या असलेल्या निरुपमा शासकीय सेवेचा वारसा चालवत आहेत.
..तर शिक्षक झालो असतो
उत्तर प्रदेशमधील सहारनपुरमध्ये शिक्षण झाल्यानंतर ईशू यांनी नवी दिल्लीतील हंसराज महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतले. घरात प्रशासकीय सेवेची परंपराच आहे. वडील मेरठ विद्यापीठात मानसशास्त्र विभागाचे प्रमुख होते. भाऊ आयटी क्षेत्रात आहेत. बालपणापासून खेळाची आवड असल्यामुळे दिल्लीत आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल आणि फुटबॉल स्पर्धेत भाग घेतला होता. खेळात प्रावीण्य असूनही शिक्षक होण्याची आवड लहानपणापासूनच होती. स्पर्धा परीक्षेच्या काळातही त्यांची ही आवड कायम होती. त्यामुळे ‘आयपीएस नसतो तर शिक्षक झालो असतो’, असे सिंधू सांगतात.
एमबीबीएस ते आयएएस
अकोला जिल्ह्यातील पंचगव्हाण (ता. तेल्हरा) येथील रहिवासी वित्त सचिव जे. पी. डांगे यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. तिघेही एमबीबीएस आहेत. निरुपमा यांनी मुंबईच्या ग्रँड मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस केले. त्यानंतर त्या काही दिवस जे. जे. हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या. नंतर त्यांनी प्रशासकीय सेवेत मोठय़ा पदावर नोकरी करण्याचा निर्णय घेतला आणि अभ्यास सुरू केला. 2007 च्या कॅडरमध्ये यूपीएससी उत्तीर्ण झालेल्या निरुपमा यांना महाराष्ट्रातच पहिली पोस्टिंग मिळाली. जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीच्या रूपात त्यांनी काम केले. सध्या त्या औरंगाबाद येथे विक्रीकर सहआयुक्त आहेत.
दिल्लीत पहिली भेट
निरुपमा दिल्लीत यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करत होत्या. ईशू सिंधूदेखील 2007 च्या बॅचमधील अधिकारी आहेत. एकदा दिल्लीतील वाजीराम क्लासेसमध्ये एका विषयावर चर्चा सुरू होती. त्यावेळी निरुपमा समोर बसल्या होत्या. चर्चाही चांगलीच रंगली होती. ईशू यांनी आपले ठाम मत मांडल्याने ते कौतुकास पात्र ठरले होते. अशा प्रकारे निरुपमा आणि ईशू यांची ही पहिली भेट झाली. सगळ्यांच्या नोट्स तयार करण्यापासून ते समस्या सोडवण्यापर्यंत ते पुढे असायचे. 2007 च्या त्या बॅचमधील 14-15 विद्यार्थीच प्रशासकीय सेवेत रुजू झालेत.
प्रेमविवाह की अरेंज मॅरेज?
शिक्षणासाठी दोघेही चार वर्षे सोबत होते. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणासाठी दोघेही मसुरीला तीन महिने सोबतच होते. सिंधू आणि डांगे कुटुंबाचादेखील चांगला परिचय होता. त्यामुळे लग्न जुळायला वेळ लागला नाही. 17 मे 2008 रोजी दोघांचे लग्न झाले. त्यामुळे आपले लग्न लव्ह मॅरेज होते की, अरेंज होते, याबाबत अजूनही संभ्रम असल्याचे ईशू सांगतात.
अव्वल अधिकारी
‘ब्युरोक्रसी टुडे’ नावाच्या मासिकाने 2012 मध्ये महाराष्ट्रातील पाच अव्वल अधिकार्‍यांचा उल्लेख केला होता. त्यात ईशू सिंधू यांचे नाव होते. महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक के. सुब्रमण्यम यांनी या नावांची निवड केली होती. शिवाय त्यांच्या नावाने सिंधू फॅन्स क्लबदेखील चालू आहे.

पुढील स्लाडमध्ये, जळगावातील ते दिवस