आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इसिसचे स्वयंघोषित कार्यकर्ते शराफतच्या चौकशीसाठी एटीएस नागपूरकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मध्यप्रदेश एटीएसने आठ दिवसांपूर्वी खंडवा येथून अटक केलेल्या शराफत ऊर्फ मुकीम खान ऊर्फ सरफराज याची चौकशी करण्यासाठी औरंगाबाद एटीएसचे एक पथक रविवारी नागपूरकडे रवाना झाले. रोजाबाग शूटआऊट प्रकरणात शराफत औरंगाबाद एटीएसला हवा होता.

गेल्या दोन दिवसांत राज्यातील विविध शहरांतून इसिसचे स्वयंघोषित कार्यकर्ते एनआयएने एटीएस आणि राज्य पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. संशयित म्हणून वैजापूर येथील इम्रान मोअज्जम पठाण यालाही एनआयएने ताब्यात घेतल्यानंतर मराठवाड्यातील संशयितांची लवकरच धरपकड होण्याची शक्यता आहे. याचे धागेदोरेही शराफतकडून मिळू शकतात.
प्रजासत्ताक दिन अवघ्या एका दिवसावर आहे. राज्यात कुठलीही घातपाताची कारवाई होऊ नये यासाठी देशातील सुरक्षा यंत्रणेने तपासाची गती वाढवली आहे. शराफतला अटक केल्यानंतर त्याचे काही साथीदार मोकळे आहेत. शराफत दहशतवादी कारवायांसाठी तरुणांना तयार करणे आणि त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम करत हाेता, असे समोर आले आहे. माल-ए-गनिमत संघटनेसाठी तो काम करत असून दहशतवादी कारवाया करणाऱ्या तरुणांना तो शस्त्रास्त्रे पुरवण्याचे काम करत असे, अशी माहिती समोर आली आहे. यापुढे या गटाचा कुठल्या घातपाताच्या कारवाईत सहभाग आहे का, याचा तपास करण्यासाठी हे पथक रवाना झाले आहे.

समुपदेशनाचा नवीन मार्ग
इसिसआणि दहशतवादी संघटनांपासून देशातील तरुण मुलांना वाचवावे यासाठी समाजातील विविध थरांतील संस्थांनी पुढाकार घेतला अाहे. शालेय विद्यार्थ्यांशी चर्चा करून मुलांच्या मनातील गैरसमज दूर केले जातात. दहशतवाद या विषयावर विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून गप्पा मारल्या जातात. विशेष म्हणजे यात पोलिस आणि एटीएसमधील बड्या अधिकाऱ्यांचा समावेश असतो.