आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिमायतबागेत 7 हेक्टरवर पिकणार इस्रायल आंबा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, इंडो इस्रायल कृती आराखड्यांतर्गत हिमायतबागेत सात हेक्टरवर इस्रायल आंब्यांची लागवड करण्यात येणार आहे. 1800 रोपे तयार करण्यात आली असून येथे मार्च 2014 पर्यंत केशर आंबा गुणवत्ता केंद्रही उभारले जाणार आहे. यासाठी 7 कोटी 44 लाख रुपये खर्चाची तरतूद शासनाने केली आहे.

इस्रायलमध्ये प्रतिहेक्टर आंब्याची उत्पादकता 25 टन आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रात चार, पाच टन एवढीच आहे. यामधील तफावत दूर करून उत्पादकता वाढवण्यासाठी केशर आंबा केंद्रात संशोधन होणार आहे. इस्रायलने विकसित केलेल्या माया, लिली, टॉमी अँटकिन्स, केन्ट, आम्रपाली, पामर या आंब्याच्या जातींची केशर आंब्याच्या जातीसोबत तुलना करण्यात येऊन मराठवाड्याच्या हवामानामध्ये कोणती आंब्याची जात फायदेशीर ठरणार, हे जाणून घेतले जाईल. मराठवाड्यात कोणत्या जातीची लागवड करावी, यासाठी हिमायतबाग फळ संशोधन केंद्रात अभ्यास केला जाणार आहे. त्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाने तयार केलेली 1800 रोपे मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकत आणली आहेत. सात हेक्टरवर या रोपांची घन पद्धतीने लागवड करण्यात येणार असून इस्रायल पद्धतीनेच लागवडीमधील अंतर, ठिबक सिंचनाचा वापर, छाटणी पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. याचा मराठवाड्यातील शेतकर्‍यांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. तीन ते चार वर्षांत या आंब्याच्या झाडाला फळे येतील. त्यानंतर संशोधनाला खर्‍या अर्थाने गती प्राप्त होणार असल्याचे कृषी शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

इमारतीचे काम अंतिम टप्प्यात
हिमायतबागेत आंब्यावर संशोधन करण्यासाठी स्वतंत्र केशर आंबा संशोधन केंद्र उभारण्यात येत आहे. इमारतीचे काम अंतिम टप्प्यात असून इमारतीत विशेष लॅबची व्यवस्था करण्यात आली आहे. 20 लाखांची अत्याधुनिक उपकरणेही लवकरच बसवण्यात येणार आहेत. 5 हजार लिटर क्षमतेचे पाण्याचे टँकर खरेदी करण्यात आले असून दोन टँकर लवकरच खरेदी केली जातील.

अंतर्गत रस्त्यांचे काम केले जात आहे. इमारत बांधकामासाठी दोन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रकल्पावर एकूण 7 कोटी 44 लाख रुपये खर्च होणार आहे. 2014 पर्यंत हा प्रकल्प सुरू होईल, असे प्रशासकीय अधिकारी तुकाराम तांबे यांनी सांगितले.

अनुवांशिकता बदलत नाही
इस्रायलमधील आंब्यांच्या जातीची आपल्याकडे लागवड केल्यास त्याच्या अनुवांशिकतेत कोणताच बदल होणार नाही. मात्र आकार, गुणवत्ता, चव, रंग यामध्ये फरक पडू शकतो. कारण तेथील हवामान आणि औरंगाबादचे हवामान यामध्ये फरक असल्याचे तांबे यांनी सांगितले. इस्रायलमध्ये आंब्याच्या झाडाला 250 ग्रॅमचे फळ लागते. आपल्याकडेही ते शक्य असून तसे झाल्यास त्यांच्याइतकेच हेक्टरी उत्पादन घेणे सहज शक्य होणार असल्याचेही तांबे म्हणाले.

शेतकर्‍यांना मोठा फायदा होईल
संथ गतीने हे काम सुरू आहे. त्याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन लवकरात लवकर प्रकल्पाचे काम पूर्ण करावे. इस्रायलच्या आंब्यांच्या जाती आणि आपल्या आंब्यांच्या जाती याचा एक प्लँट तयार करण्यात येऊन उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. असे झाले तर शेतकर्‍यांना जास्तीत जास्त फायदा होईल. त्र्यंबक पाथ्रीकर, आंबा उत्पादक शेतकरी.