आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृत्रिम पावसाआधी कोसळल्‍या नैसर्गिक सरी; विमान बीड, उस्‍मानाबादकडे रवाना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कृत्रिम पाऊस पाडण्‍यासाठी औरंगाबादमध्‍ये दाखल झालेले विमान - Divya Marathi
कृत्रिम पाऊस पाडण्‍यासाठी औरंगाबादमध्‍ये दाखल झालेले विमान
औरंगाबाद- कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी लागणाऱ्या रसायनयुक्त नळकांड्या म्हणजेच फ्लेअर्स मुंबईच्‍या कस्टम विभागातून आज (मंगळवार) औरंगाबादमध्‍ये दाखल झाल्‍या आहेत. दरम्‍यान, त्‍यापूर्वीच औरंगाबादमध्‍ये रिमझिम पाऊस सुरू झाला. दरम्‍यान, कृत्रिम पाऊस पाडण्‍यासाठी आलेल्‍या विमानाने 2 वाजताच्‍या सुमारास बीड आणि उस्‍मानाबादकडे उड्डाण घेतली.
कालपर्यंत सी डॉपलर रडार हाँगकॉँगमध्ये आणि फ्लेअर्स मुंबईच्या कस्टम विभागात अडकून होती. दरम्‍यान, फ्लेअर्स मंगळवारी सकाळी शहरात दाखल झाले आहे. या मोहिमेसाठीचे विमान शनिवारी दुपारी दीड वाजता शहरात दाखल झाले. मात्र, पाऊस पाडण्यासाठीची संपूर्ण यंत्रणा जुळाली नव्‍हती. त्‍यामुळे हा प्रयोग लांबणीवर पडला.

विदर्भात दमदार हजेरी
आज (मंगळवारी) पावसाने विदर्भात पावसाने दमदार हजेरी लागली. सध्‍या चंद्रपूर, भंडारा, अकोला या जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला.
आज प्रयोगाची शक्यता
मंगळवारी सकाळी या फ्लेअर्स औरंगाबादमध्‍ये आल्‍या आहेत. स्वत: दिवसे यांनी कस्टम अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. या फ्लेअर्स स्फोटके वर्गात येत असल्यामुळे त्यांना विमानातून वाहतुकीची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे त्या रस्तामार्गे औरंगाबादल रवाना करण्यात आल्या आहेत. मंगळवारी हवामानाचा अंदाज घेऊनच पावसाचा प्रयोग राबवला जाणार आहे.
रडार पथकाकडून पाहणी
दरम्यान विमानात आलेल्या सात जणांच्या पथकाने विभागीय आयुक्तालयात रडार बसवलेल्या टॉवरची पाहणी केली. विभागीय आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांशी चर्चाही केली. यामध्ये ए. के. आरोग्यस्वामी, शहजाद मिरी (पायलट) बायरॉन पेडरसन (पायलट) टॉड स्कुझ (इलेक्ट्रानिक्स तंत्रज्ञ) रिचर्ड फेरर (मेकॅनिक) रोनाल्ड रिनहार्ट (हवामान तज्ञ) बी. विवेकानंद (पायलट) यांचा समावेश होता.

फ्लेअर्स २४ तास कस्टमच्या कस्टडीत
सोमवारी कृत्रिम पावसाचा प्रयोग होणार होता. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सुहास दिवसे औरंगाबादकडे निघालेही होते. मात्र रविवारी दुपारपासून फ्लेअर्स मुंबईच्या कस्टम विभागाकडे अडकून पडले. हे आठ हजार फ्लेअर्स अमेरिकेतून मागवले असून ती वर्गीकृत स्फोटके असल्यामुळे परवानगी मिळाली नव्हती. त्यामुळे हा प्रयोग लांबणीवर पडल्याचे विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी सांगितले.

आयती संधी हुकवली
सोमवारी परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. विदर्भात पाऊस झाला. त्यामुळे सोमवारी प्रयोग झाला असता तर कृत्रिम पाऊस बरसला असता.
- श्रीनिवास औंधकर, हवामानतज्ञ

मंत्रालय कशाला?
समस्या सोडवण्याऐवजी सरकारच समस्या निर्माण करीत आहे. मुंबईत फ्लेअर्स अडकल्यावर मंत्रालय, सारे मंत्री तिथे असताना मराठवाड्याच्या प्रश्नासाठी इतका उशीर कसा लागतो ?
- गुणवंत पा. हंगरगेकर, शेतकरी संघटना

डॉपलर रडारशिवाय प्रयोग शक्य
कृत्रिम पावसासाठी डॉपलर रडारशिवाय पाऊस पाडणे शक्य आहे. त्याला यश देखील मिळेल. मात्र रडार असल्यानंतर त्यात अचुकता मिळते.
रोनाल्ड रिनहार्ट, हवामानतज्ज्ञ

नाशिक जिल्ह्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग फसला
नाशिक जिल्ह्यातील सायगावात सोमवारी कृत्रिम पावसाचा प्रयोग फसला. हवामानाचा अंदाज, आकाशातील बाष्पयुक्त ढगांची अनुकूलता याचा अभ्यास करून सोडलेल्या सात रॉकेटपैकी केवळ एकच रॉकेट यशस्वी ठरले. मात्र याही रॉकेटने पावसाचा थेंबही पडला नाही. ढगांची उंची अधिक असल्याने तसेच हवेचा वेग मोठ्या प्रमाणात राहिल्याने चार किलोमीटर उंचीवर जाणारे ग्यान अंजली हे रॉकेट अयशस्वी झाल्याचा दावा पथकाने केला.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...