आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Issue About Aurangabad Municipal Corporation Commissioner Prakash Mahajan

प्रकाश महाजन यांनी दिले बदली, कायद्यास आव्हान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- अविश्वास ठराव संमत झाल्यानंतर औरंगाबाद महापािलकेच्या आयुक्तपदावरून सोमवारी हटविण्यात आलेले आयुक्त प्रकाश महाजन यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली असून बदलीचा आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे. आयुक्तांविरुद्ध अविश्वास ठराव संमत करण्याचा महापालिकेला आणि त्या ठरावानुसार त्या पदावरून हटवण्याचा राज्य सरकारला अधिकार देणाऱ्या कायद्यातील तरतुदीलाही या याचिकेद्वारे त्यांनी आव्हान दिले आहे.

प्रकाश महाजन यांच्या वतीने विधिज्ञ सतीश तळेकर यांनी मंगळवारी ही याचिका दाखल केली. त्यावर बुधवारी न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि व्ही. के. जाधव यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. राज्याच्या नगरविकास विभागाचे सचिव, औरंगाबाद महापालिकेचे महापौर, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांच्यासह राज्याचे पर्यावरणमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनाही या याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे. महापालिकेच्या हितासाठी आपण शिवसेना, भाजप आणि एमआयएमच्या नगरसेवकांच्या वैयक्तिक हिताला विरोध केला, त्यांचा हस्तक्षेप नाकारला आणि त्यांच्या गैरकारभाराला आळा घालण्याचा प्रयत्न केला, म्हणूनच आपल्याला या पदावरून हटवण्यासाठी ही कृती करण्यात आली आहे, असे आरोपही महाजन यांनी याचिकेत केले आहेत.

मुख्यमंत्री आणि नगरविकासमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ नोव्हेंबर रोजी झालेल्या भेटीच्या वेळी आपल्याला अभय दिले होते आणि महापालिकेने केलेला अविश्वास ठराव रद्द केला जाईल असेही सांगितले होते. मात्र, शिवसेना-भाजपचे नगरसेवक आणि विशेषत: पालकमंत्री रामदास कदम यांनी राजकीय दबाव आणल्यामुळे आपल्याला आयुक्त पदावरून हटविण्यात आले आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. आपली बदली म्हणजे आपल्यासारख्या प्रामाणिक आणि चारित्र्यवान अधिकाऱ्याला, विशेषत: आपली निवृत्ती जवळ आलेली असताना अकारण दिलेली शिक्षा आहे, असेही महाजन यांनी या याचिकेत नमूद केले आहे.

वैयक्तिक आरोप : प्रकाश महाजन यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या या याचिकेत शिवसेनेचे सभागृहनेता राजेंद्र जंजाळ आणि भाजपचे उपमहापौर प्रमोद राठोड यांच्यावर वैयक्तिक आरोप करण्यात आले आहेत. शिवाय, नगरसेवकांवर भ्रष्ट, गैरव्यवहारी आणि अप्रामाणिकपणाचेही आरोप करण्यात आले आहेत.

पदभार दिलेला नाही
दरम्यान, आपली बदली करण्यात आलेली असली तरी आदेशात नमूद असलेल्या अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांना आपण पदभार सोपविलेला नाही आणि त्यांनीही पदभार घेतलेला नाही, असेही याचिकेत स्पष्ट करण्यात आलेले आहे. मात्र, शासनाच्या आदेशानुसार आपण मुंबईत असल्याचे आणि बुधवारी औरंगाबादला येणार असल्याचे महाजन यांनी मंगळवारी दुपारी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

कायद्यातील तरतुदीलाच आव्हान : दरम्यान, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पेारेशन अॅक्टच्या कलम ३६(३) लाही या याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. कायद्यातील हे कलम महापालिकेला अतिरिक्त संवैधानिक अधिकार देते, कारण जी महापालिका आयुक्ताची नियुक्ती करू शकत नाही तिला आयुक्ताला पदावरून हटविण्याचाही अधिकार असू शकत नाही. शिवाय कायद्यातील ३६(३) हे उपकलम ३६(१) या उपकलमाच्याच विरोधात जाणारे आहे, असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
केंद्रेकर प्रभारी अायुक्त
मंगळवारी सायंकाळी वेगवान घडामोडी घडून सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांच्याकडे मनपा आयुक्तपदाचा प्रभारी कार्यभार सोपवण्यात आला. केंद्रेकर धडाडीचे, कार्यक्षम अधिकारी आहेत. त्यांनी मनपाचा कारभार पाहावा, असा मुख्यमंत्री फडणवीस यांचाच आग्रह होता. त्यामुळे केंद्रेकरांनी नवी जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दाखवल्याचे सूत्रांनी सांिगतले.