आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Issue About Aurangabad Municipal Corporation Commissioner Sunil Kendrekar Transfer

केंद्रेकरांनी दिला होता राजीनाम्याचा इशारा- मुख्यमंत्री म्हणाले नाइलाज झाला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मी मराठवाड्यातील अधिकारी ओढून विदर्भात नेत आहे हा आरोप चुकीचा आहे. सुनील केंद्रेकर यांनी स्वत:च आपल्याकडील मनपाचा कार्यभार काढून घ्या, नाही तर राजीनामाच देतो, अशी भूमिका घेतल्याने त्यांच्याकडील कार्यभार काढून घेतला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

मुंबईत भाजपच्या शिष्टमंडळाला मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी हे उत्तर दिल्याने याप्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. केंद्रेकरप्रकरणी नागरिकांच्या संतप्त भावना कळवण्यासाठी भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, उपमहापौर प्रमोद राठोड, स्थायी समिती सभापती दिलीप थोरात, कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संजय केणेकर, दिलीप बनकर आदींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर बोराळकर म्हणाले की, केंद्रेकर मनपातच हवेत, ही जनभावना मुख्यमंत्र्यांना सांगितल्यानंतर ते म्हणाले की, केंद्रेकरांकडे सिडकोचा सहा विभागांचा कार्यभार आहे. त्यात मनपाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला होता; पण त्यांनी आपल्याकडे अधिक कार्यभार असल्याने मनपाचा कार्यभार काढून घ्यावा, अशी मागणी माझ्याकडे केली होती. जर कार्यभार काढला नाही तर राजीनामा देतो, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. म्हणूनच आयुक्तपदाचा कार्यभार काढला. बकोरियाही अतिशय कार्यक्षम, पुण्यात सर्वाधिक मागणी असलेले अधिकारी आहेत. केंद्रेकरांसाठीचा आग्रह योग्य असला तरी दुसरा चांगला अधिकारी औरंगाबादला दिला आहे.
महापालिकेत आयुक्तपदी येण्याच्या तयारीत असलेले ओमप्रकाश बकोरिया यांच्या आक्रमक कार्यपद्धतीची माहिती मंगळवारी औरंगाबादकरांना दिव्य मराठीच्या माध्यमातून ठळकपणे मिळाली. त्यामुळे सुनील केंद्रेकर यांच्याकडील आयुक्तपदाचा कार्यभार काढल्याबद्दल लोकांच्या मनात उमटलेली संतापाची तीव्रता काही प्रमाणात ओसरली. काल आंदोलनाच्या तयारीत असलेल्या सीएमआयएसह ४० संघटनांनी ठोस भूमिका घेण्यासाठीची बैठक पुढे ढकलली. दुसरीकडे सिडको कॅनॉटमध्ये उत्स्फूर्तपणे एकत्रित झालेल्या नागरिकांनी बुधवारी दुपारी महापालिका मुख्यालयासमोर धरणे धरण्याचा निर्णय घेतला. सामाजिक कार्यकर्ते विजय निकाळजे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. दरम्यान, मनपाचा कार्यभार काढला नाहीतर राजीनामा देतो, असे काही दिवसांपूर्वी केंद्रेकरांनीच सांगितल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला सांगितल्याने एकूणच या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या माहितीतील सत्यता पडताळण्यासाठी केंद्रेकर उपलब्ध होऊ शकले नाहीत.

काल केेंद्रेकर यांच्याकडील कार्यभार काढल्याचे वृत्त पसरताच सर्वस्तरात संतप्त भावना व्यक्त झाली. सीएमआयएसह ४० विविध संघटनांनी आंदोलनाची तयारी केली होती. परंतु, आयुक्तपदी येणारे बकोरियाही भ्रष्ट ठेकेदारांच्या विरोधात आहेत. सत्ताधाऱ्यांचा दबाव जुमानत नाहीत. त्यामुळेच त्यांची आठ वर्षांत सात वेळा बदली झाली. लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात त्यांनाही प्रचंड स्वारस्य आहे, अशी माहिती दिव्य मराठीने दिली. त्यामुळे संतापाच्या भावनेची तीव्रता कमी झाल्याचे दिसून आले. केंद्रेकरांच्या बदलीच्या हालचाली सुरु झाल्या असताना गेल्या महिन्यात शहर विकासाचे अभ्यासक सारंग टाकळकर यांनी पुढाकार घेत शहरातील ४० संघटनांना या विषयावर एक आणले होते. या संघटनांनी केंद्रेकरांसाठी वाटेल ते आंदाेलन करण्याची तयारी दर्शवली होती. सीएमआयएसारख्या संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. पण काल केंद्रेकरांचा पदभार काढण्यात आल्यानंतर या संघटनांची बैठक घेण्याच्या हालचाली सुरु झाले असता या विषयावर नेमके काय करायचे हेच ठरत नसल्याने आजची नियोजित बैठक झालीच नाही.

सिडकोतनागरिकांचा पुढाकार
सीआरटीसंस्थेच्या सनवीर कौर छाबडा, नताशा झरीन, गौरी मिराशी, मिलिंद पाटील, प्रा. संतोष पाटील आदींच्या पुढाकाराने मंगळवारी कैनॉट प्लेस येथे नागरिकांची बैठक झाली. एका फलकावर केंद्रेकरांना पूर्ण कार्यभार सोपवा, अशी मागणी करणारे संदेश नोंदवण्यात आला. एक हजार नागरिकांच्या सह्या असणारे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवले जाणार आहे. बुधवारी दुपारी चारनंतर महापालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचे ठरले. यावेळी तारा बसोले, डॉ. सुनिल साहुजी, किरण काळे, अनंत मोताळे, मेघा बडजाते, डॉ. सीमा दहाड, ज्ञानेश्वर अप्पा खर्डे यांच्यासह अनेक नागरिकांची उपस्थिती होती.

पुढीस स्लाइड्सवर वचा, बकोरियांचे आगमन लांबले...
- उमरिकर बसणार उपोषणाल...
- आता या कामांचे काय होणार...