आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करार ‘प्रासंगिक’, कामे भारंभार; आकाशवाणीचा अजब कारभार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- बहुजनहिताय बहुजनसुखाय बिरूद मिरवणाऱ्या आकाशवाणीत सध्या प्रासंगिक उद्घोषकांवर राब राब राबण्याची वेळ आली आहे. कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांअभावी प्रासंगिकांच्याच भरवशावर अाकाशवाणी केंद्र सुरू आहेत. ज्यांच्या आवाजामुळे आकाशवाणी घरोघरी पोहोचते त्यांंच्या आवाजाला भारंभार कामामुळे घरघर लागल्याचे चित्र आहे.
कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची सर्व कामे करवून घेऊनही त्यांचे नियमितीकरण केले जात नसल्याचे मत अखिल भारतीय प्रासंगिक उद्घोषक संघटनेने व्यक्त केले आहे. यासाठी हजारो प्रासंगिक उदघोषकांनी ऑगस्टमध्ये दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आंदोलन केले होते. प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी याप्रकरणी कारवाईचे संकेत दिले आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार, आकाशवाणीचे १२१ कोटी श्रोते आहेत. आकाशवाणीत २६,१२९ कर्मचारी आहेत. त्यापैकी ६,८९६ जणांचा थेट प्रसारणाशी संबंध येतो. यातील ४,२७१ प्रासंगिक उद्घोषक असल्याचे प्रसारभारतीने माहिती अधिकारात सांगितले आहे. संघटनेचे सचिव करतापसिंग ठाकूर यांच्या मते, प्रसारभारतीकडून वारंवार उद्घोषकांविषयी चुकीची माहिती दिल्यामुळे सरकारपर्यंत नियमितीकरणाचा मुद्दा पोहाचलाच नाही. काही खासदारांनी संसदेत हा मुद्दा सातत्याने लावून धरल्याने प्रसारण मंत्र्यांनी यासाठी विशेष समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे.

नियमितीकरण व्हायला हवे
इतक्या वर्षांपासून प्रासंगिक उद्घोषकांच्याच भरवशावर आकाशवाणीचे प्रसारण कार्य सुरू आहे. अर्थातच या क्षणी नियमितीकरण त्यांचा हक्क आहे आणि ते व्हायलाच हवे. या लढ्यासाठी मी त्यांच्यासोबत आहे. हेमंतगोडसे, खासदार, नाशिक

न्यायालयाची दिशाभूल
संघटनेच्यामते, मंजूर पदाच्या जागी व्यक्ती १० वर्षे कार्यरत असेल तर त्याला नियमितीकरणाचा अधिकार असल्याचे पटना न्यायालयाने १९९९ मध्ये या प्रकरणाच्या सुनावणीत म्हटले होते. मात्र, महासंचालनालयाने महिन्यातून दिवस काम करणे नियमितीकरणास पात्र ठरत नसल्याचा दावा केला. मुळात त्या ड्यूटीज आहेत. एका ड्यूटीसाठी उद्घोषकाला दिवस तरी खर्ची घालावे लागतात, हे यामागचे खरे तथ्य आहे.
नाव उद्घोषक, कामे मात्र कारकुनी
-प्रत्येक नैमित्तिक उद्घोषकाला महिन्यातून आणि वर्षांतून ७२ ड्यूटीज मिळायल्या हव्यात. मात्र, याबाबत अनेक केंद्रामध्ये दुजाभाव केला जातो.
-उद्घोषणा किंवा कार्यक्रम निर्मितीपुरताच उद्घोषकांचा संबंध असतो. मात्र, रेकॉर्ड बनवणे, गाण्यांची शेड्यूलिंग करणे, महासंचालनालयाकडून आलेले संदेश लिहणे अशाप्रकारची कार्यालयीन कामेही प्रासंगिक उद्घोषकांकडूनच करून घेतल्या जात आहेत.
-नियुक्ती वेळी एकदाच ऑडिशन देणे आवश्यक असताना अनेक केंद्रांमध्ये दरवर्षी विनाकारण ऑडिशन घेतल्या जातात. मुळात केरळ उच्च न्यायालयाकडून अशा प्रकारच्या दरवर्षीच्या ऑडिशनला बंदी घालण्यात आली आहे.
-महिला उद्घोषकांचे बऱ्याच ठिकाणी शोषण झाल्याचा संघटनेचा आरोप आहे. शिवाय, नियमित कर्मचाऱ्यांपेक्षा सरस कामे करूनही त्यांना अत्यंत दुय्यम वागणूक दिली जात आहे.
नियमित उद्घोषकांची भरतीच नाही : १९९२पासून आतापर्यंत शेकडो कायमस्वरूपी उद्घोषका सेवानिवृत्त झाले. मात्र, एकदाही उद्घोषकांची भरती करण्यात आलेली नाही. त्यांच्याकडूनच सर्व प्रकारची कामे करून घेतली जात आहेत.
बातम्या आणखी आहेत...