आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Issue About Municipal Corporation Commissioner In Aurangabad

भाजपमुळे "अविश्वास' बारगळणार, नव्या-जुन्यांचा संघर्ष, बड्या नेत्यांनी अंग काढले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मनपाआयुक्त प्रकाश महाजन यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय भाजपने घेतला नसून मनपातील पदाधिकाऱ्यांनी तो वैयक्तिक पातळीवर घेतल्याचे स्पष्ट करीत भाजपने पाऊल माघारी घेतले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे सोमवारी (दि. १६) याबाबत निर्णय घेणार असून तोच पक्षाच्या नगरसेवकांना बंधनकारक राहणार असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. भागवत कराड यांनी सांगितल्याने आता हा अविश्वास ठराव बारगळण्याची चिन्हे दिसत आहेत.
मनपा आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव आणण्यावरून गेल्या दोन महिन्यांपासून मनपात उलथापालथी सुरू आहेत. मागच्या महिन्यात शिवसेनेने तयारी केली असताना भाजपने माघार घेतली. आता भाजपने तयारी दाखवल्यावर शिवसेनेतील अंतर्गत राजकारणामुळे निर्णय घेण्यास वेळ लागला शेवटी भाजपने पुढाकार घेतला तर पाठिंबा द्या, असा निर्णय शिवसेनेने घेतला. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी भाजपचे उपमहापौर प्रमोद राठोड, भगवान घडामोडे, दिलीप थोरात या भाजपच्या नेत्यांनी सह्या करीत अविश्वास ठराव दाखल केला. आता या नाट्याला नवीन वळण आले असून भाजपने अंग काढून घेतल्यासारखीच स्थिती आहे.
डॉ. भागवत कराड ‘दिव्य मराठी’शी बोलताना म्हणाले की, महाजन यांच्यावर अविश्वास ठराव आणायचा ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही. आमची येथे कोअर कमिटी आहे. त्यांना हा विषय माहीत नाही. पक्षाच्या पातळीवरही हा विषय आला नाही. ज्या पदाधिकाऱ्यांनी या ठरावावर सह्या केल्या तो त्यांनी वैयक्तिक पातळीवर घेतलेला निर्णय आहे. अविश्वास ठराव आणायचा की नाही याबाबत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेच निर्णय घेणार असून उद्या सोमवारी याबाबत निर्णय होईल. त्यांचा निर्णय सगळ्यांना बंधनकारक असेल.

अविश्वास ठराव आणायला हवा की नाही असे विचारले असता डाॅ. कराड म्हणाले की, माझे वैयक्तिक मत असे आहे की दोन महिने निवृत्तीला बाकी असताना असा ठराव आणायला नको. मीही दोन वेळा महापौर होतो. अधिकाऱ्यांना समजावून सांगून कामे करून घेता येतात. त्यासाठी हा मार्ग नाही. उलट महाजन यांना हटवल्यावर कुणी तात्पुरत्या स्वरूपात अधिकारी आयुक्त म्हणून आला तर पुन्हा शहराचा विकास कामे खोळंबतील. ते परवडणारे नाही. भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनीही अद्याप याबाबत प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्याकडून कोणतेही आदेश आलेले नाहीत, असे सांगितले.
भाजपच्या ताज्या भूमिकेमुळे अविश्वास ठराव पुन्हा बारगळणार असल्याचे दिसत आहे. भाजपमधील या घडामोडींच्या मागे पक्षातील जुने बाहेरून आलेले असा संघर्ष आहे. आयुक्त हटावसाठी प्रमोद राठोड यांनी पुढाकार घेताना पक्षातील बड्या नेत्यांना विश्वासात घेतल्याने जुनेजाणते नाराज आहेत. शिवाय नव्याने पक्षात आलेल्यांनी मनपात पक्षाचा ताबा घेणे जुन्यांना मानवणारे नसल्याचेही दिसते. मूळ भाजपवासी नेत्यांच्या मते भाजपने आतापर्यंत कधीही एखाद्या आयुक्ताला हटवा, अशी टोकाची भूमिका घेतलेली नाही. तसे करणे शहराच्या विकासासाठी योग्य नसल्याचे सांगत त्यांनी बाहेरून येणाऱ्यांनी आपल्या इगोसाठी आयुक्त हटाव मोहीम सुरू केल्याचे चित्र पक्षाची प्रतिमा मलिन करणारा असल्याचेही सांगितले.