आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Issue Of Health : Lungs Rare Operation Now Handle In Ghati

प्रश्‍न आरोग्याचा : यकृताच्या दुर्मिळ शस्त्रक्रियांसाठी घाटी सज्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - यकृताच्या गंभीर-गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी घाटी सज्ज झाले असून कर्करुग्णाचे उजव्या भागाचे तब्बल अर्धे यकृत काढून नुकतीच पहिली शस्त्रक्रिया करण्यात यश मिळाले आहे. विशेषत: यकृताच्या उजव्या भागातील शस्त्रक्रिया अधिक क्लिष्ट समजण्यात येते. मात्र, ही शस्त्रक्रिया आता घाटीमध्ये होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खासगी रुग्णालयांमध्ये काही लाखांमध्ये होणारी ही शस्त्रक्रिया घाटीमध्ये काही हजारांमध्ये होत आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) अलीकडे यकृत व पित्ताशयाच्या विविध मोठय़ा तसेच गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया होत आहेत. या शस्त्रक्रिया यकृताचा कर्करोग, पित्ताशयाचा कर्करोग, पित्ताशयाच्या नळीचा कर्करोग, अपघातामध्ये गंभीर इजा पोहोचलेले यकृत (लिव्हर ट्रॉमा) आदी आजार तसेच इतर कारणांसाठी केल्या जातात. मात्र, वेगवेगळ्या कारणांमुळे मुळातच यकृताच्या शस्त्रक्रियांचे प्रमाण इतर शस्त्रक्रियांच्या तुलनेत खूप कमी आहे. कर्करोगाच्या इतर शस्त्रक्रियांच्या तुलनेतही यकृताच्या शस्त्रक्रियांचे प्रमाण कमीच आहे. तरीसुद्धा गेल्या आठ-नऊ वर्षांत आतापर्यंत घाटीमध्ये यकृताच्या डाव्या बाजूच्या किमान पाच-सहा मोठय़ा शस्त्रक्रिया झाल्या आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी उजव्या बाजूची पहिलीच मोठी व क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. ही शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाच्या यकृताचा उजवा अर्धा कॅन्सरग्रस्त भाग (50 टक्के) काढण्यात आला होता. यापुढे अशा शस्त्रक्रिया घाटीमध्ये होण्यात अडसर राहणार नाही, असे शल्यचिकित्साशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. अनघा वरूडकर यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. विशेषत: नाममात्र शुल्कात या शस्त्रक्रिया घाटीमध्ये होतात, असेही डॉ. वरूडकर यांनी सांगितले.


दुर्बिणीद्वारे घाटीत ‘हर्निया’ची शस्त्रक्रिया
घाटीच्या शल्यचिकित्साशास्त्र विभागामध्ये आता दुर्बिणीद्वारेही विविध शस्त्रक्रिया होत आहे. यामध्ये पित्ताशय, अपेंडिक्स तसेच हर्नियाची शस्त्रक्रियाही होत आहे. त्याचप्रमाणे विभागामध्ये स्वादुपिंड, स्वादुपिंडाचे खडे, स्वादुपिंडाचा कर्करोग आदींच्याही शस्त्रक्रिया होत असल्याचे सांगण्यात आले.


‘लिव्हर कॅन्सर’ची उजव्या भागाची पहिली क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी


यकृताचा कर्करोग होण्याची मुख्य कारणे
0 रुग्णास कावीळ ‘ब’ व ‘क’ असणे
0 रक्तसंक्रमणाद्वारे रुग्णास होऊ शकते कावीळ ‘ब’ व ‘क’
0 मद्यसेवन किंवा मद्यसेवनामुळे
0 रुग्णास झालेला सिरॉसिस आजार


कर्करोगाची लक्षणे
0 पोटामध्ये गोळ्याचा स्पश्र होणे
0 संबंधित रुग्णाचे यकृत मोठे होणे
0 रुग्णास पिवळी कावीळ होणे
0 अनेक वेळा उशिरा लक्षणे दिसतात