आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद : मोठ्या आयटी कंपनीची १३ ला घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महाराष्ट्र राज्यात जगविख्यात आयटी कंपनी येण्यास इच्छुक असून त्यांना औरंगाबादेत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यास आयटी इनोव्हेशन सेंटरची आवश्यकता असून जागेचा शोध घेण्यात येत आहे. कंपनीचे नाव मेक इन इंडिया कार्यक्रमात १३ फेब्रुवारीला जाहीर करणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात महाराष्ट्र शासन आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजच्या वतीने दोनदिवसीय इन्व्हेस्टमेंट इन महाराष्ट्र, इन्व्हेस्ट इन मराठवाडा-२ समीट सुरू होती. शुक्रवारी या परिषदेचा समारोप झाला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार चंद्रकांत खैरे, सीआयआय मराठवाडा अध्यक्ष एन. श्रीरामज, सुभाष देसाई, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुनील खन्ना आणि संदीप नागोरी यांची उपस्थिती होती.

देसाई म्हणाले, राज्याचे नाव उद्योगात सर्वोच्च आहे. त्यात मराठवाडा आणण्यासाठी त्याची ग्लोबल ओळख होण्यासाठी आयटी, ऑटोमोबाइल आणि टेक्स्टाइल उद्योगांना येथे आणणे महत्त्वाचे आहे. केंद्र शासनाकडून मेक इन इंडिया कार्यक्रम राबवण्यात येत आहे. मात्र, जोपर्यंत महाराष्ट्रात उद्योगांची भरभराट होणार नाही तोपर्यंत मेक इन इंडियाचा अर्थ पूर्ण होणार नाही. त्यातही महाराष्ट्र राज्यातून मराठवाडा महत्त्वाचा असल्याने मराठवाड्यातही उद्योग उभारणे महत्त्वाचे असणार आहे. आपल्या शेजारच्या राज्यांत उद्योगांना स्वस्त वीज मिळत असल्याने त्यांच्या उत्पादनांचीही किंमत कमी आहे. आपली उत्पादने वीज महाग असल्याने जास्त दरात विक्री होतात. त्याचा उत्पादनावरही परिणाम होतो. त्यामुळे वीजदर कमी करण्यासाठी कॅबिनेट स्तरावरून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचबरोबर राज्याच्या उद्योग उभारणीत मागासवर्गीयांनाही संधी देणे अपेक्षित असल्याने त्यांच्यासाठीही पॉलिसी ठरवत आहे.
विमानतळ विस्तारीकरणासाठी डीएमआयसीला दोनशे कोटी रुपये देण्यात आले असून त्यातून जमीन संपादित करण्यात येईल. त्यामुळे विमानतळाचा विस्तार होऊन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमाने येण्या-जाण्यास मदत होणार असल्याचेही देसाई म्हणाले.
मराठवाड्यातीलतरुणांनी रोजगाराकडे वळावे : मराठवाड्यातसातत्याने दुष्काळ पडत असल्याने नापिकी वाढत आहे. पूर्ण कुटुंबच त्यावर अवलंबून असल्याने त्यांचा उदरनिर्वाह होण्याची समस्या वाढली आहे. त्यामुळे तरुणांनी उद्योगातील रोजगाराकडे वळावे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात हीच अवस्था होती. तेथील तरुणांनी उद्योगात रोजगार मिळवून उत्पन्न मिळवलेच, पण उत्पन्नाची जोड शेतीलाही दिली.

सरकारी बाबूंवर नाराजी... : आम्ही मंत्रालयातून अथवा राज्यस्तरावरून उद्योगांसाठी चांगली आणि उद्योगांना पूरक अशा योजना राबवत असतो. त्यासाठी वेळोवेळी नियम, जीआर आणि परिपत्रक काढत असतो. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांवर असते. मात्र, या बाबू मंडळींकडून नीट कामे होत नाहीत. जबाबदारी झटकून ते मोकळे होत असल्याने अधिकारी, कर्मचारी बाबूंवर त्यांनी नाराजी व्यक्त केली.

उद्योगाच्या भरभराटीसाठी प्रयत्न : पहिल्या पिढीपासून शहरात उद्योग वाढत असून त्यांच्या भरभराटीसाठी मी प्रयत्न करत आहे. आणखी उद्योग वाढण्यासाठी नॅशनल हायवे आणि मनमाडचा इंधन डेपो शहरात आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले.