आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादच्या वाणिज्य पदवीधर तरुणाने उभारली शेतात आयटी कंपनी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शिक्षण परंपरागत, नोकरीही काहीशी तशीच; पण ज्या कंपनीत नोकरी करतो तशीच स्वत:ची कंपनी असावी असा तरुणाने निर्धार केला. याच जिद्दीतून उभी राहिली औरंगाबादजवळच्या एका शेतात एक अालिशान आयटी कंपनी. देशभरातील अभियंत्यांसह अमेरिकेतील काही साॅफ्टवेअर इंजिनिअर्स नोकरीसाठी जोडले जात आहेत.
रवींद्र मधुकर वायबसे असे या तरुणाचे नाव. वाणिज्य शाखेत पदवी मिळवल्यानंतर तेवढ्यावर नोकरी लागणार नाही म्हणून पुढे एलएलबी केले आणि सन २००० मध्ये पुण्याच्या साॅफ्टवेअर कंपनीत कायदेविषयक सल्लागार म्हणून नोकरी सुरू केली. पुढे आयटी क्षेत्रातील मंदीमुळे अस्थैर्य जाणवू लागले. त्याच क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या गोपीनाथ लटपटे यांनीही नोकरी सोडली आणि अमेरिकेत जाऊन एक कंपनी सुरू केली.
काही दिवसांतच आयटी क्षेत्रातील मंदी संपणार आहे हे लक्षात आल्यावर आपणही लटपटे यांच्यासारखी कंपनी का सुरू करू नये, असा विचार करून त्यासाठी आवश्यक एमबीएचे शिक्षण घेऊन नोकरी सोडली. लटपटे यांच्या मदतीने वायबसे यांनी भारतात आयटी कंपनी स्थापन केली.
पुण्या-मुंबईची मक्तेदारी मोडली

आयटी कंपनीत काम करणारे इंजिनिअर्स पुणे, मुंबई, बंगळुरू यासारख्या शहरांतच नोकरी पसंत करतात. त्यामुळे औरंगाबादसारख्या शहरात अशा कंपन्यांसाठी मनुष्यबळ मिळणार नाही, अशी भीती अनेकांना वाटत होती. पण वायबसे यांच्या ‘व्हॅल्यू डी’ कंपनीने असा लौकिक मिळवला आहे की त्या मोठ्या शहरातले अभियंतेही नोकरी सोडून या कंपनीत रुजू झाले आहेत. जूनमध्ये अमेरिकेतलेही काही अभियंते रुजू होणार आहेत. आज या कंपनीत ७० तरुण-तरुणी काम करतात. त्यात बाहेरच्या राज्यांतील तरुणांचा समावेश आहे.

कंपनीच्या इमारतीचे नुकतेच उद्घाटन झाले. त्यासाठी आयबीएम कंपनीचे एमडी सॅरेना टोनी हजर होते. ही इमारत शहराजवळच्या एका शेतात उभारण्यात आली. औरंगाबादच्या आयटी पार्कमधील प्लाॅट आधीच विकले गेले असल्यामुळे शेतात इमारत बांधावी लागली, असे वायबसे यांनी सांगितले.