आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Italy Model Of Water Tourism Possible In Aurangabad

जलपर्यटनाचे इटली मॉडेल औरंगाबादेत शक्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - क्रोएशिया, स्पेन, पोर्तुगाल, इटली, ओमान या देशांतील चारशे वर्षांपूर्वीच्या नहरी आजही तेथील नागरिकांची तहान भागवत आहेत. त्या पर्यटकांचे आकर्षणही बनल्या आहेत. मात्र, ऐतिहासिक वारसा असलेल्या औरंगाबादच्या नहरी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. नहरींचा वारसा लाभलेल्या जगातील मोजक्या शहरांपैकी औरंगाबाद हे शहर आहे. येथील नऊ नहरी आजही शहराची तहान भागवण्यासाठी सक्षम आहेत. इटलीप्रमाणे शहरातील नहरी जलपर्यटनाचे इटली मॉडेल बनू शकतात, असे इतिहासकार आणि तज्ज्ञांचे मत आहे.

नहरींची सध्याची स्थिती
शहरापर्यंत आणलेल्या प्रमुख नऊ नहरींवर अतिक्रमणे झाली आहेत. अनेक नहरींची तोडफोड झाली असून जिवंत नहरींमधून पाण्याची चोरी होत आहे. नहरींच्या बंबांना सुरक्षा देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांची तोडफोड होत आहे. पुरातत्त्व खात्याच्या नियमानुसार 100 वर्षांपेक्षा जुनी ऐतिहासिक वास्तू देशाचा वारसा आहेत. त्याचे नुकसान करणार्‍यांवर कारवाई होणे आवश्यक आहे. मात्र, शहरातील अनेक भागांतील नहरींची रस्ता रुंदीकरणादरम्यान तोडफोड झाली आहे. केवळ समिती स्थापन करून चालणार नाही, तर लोकसहभागातून विकास होणे अपेक्षित आहे. लोकांना या ऐतिहासिक नहरींचे महत्त्व कळाल्यास लोक त्याची काळजी घेतील. त्यामुळे शहराला सक्षम पाण्याचे स्त्रोत तर मिळेलच त्यासोबत पर्यटनालाही चालना मिळेल इतिहासकारांचे मत आहे.
अस्तित्वात असलेल्या नहरी

0 नहर-ए-अंबरी : जोबन टेकडी, हसरूल सावंगीच्या डोंगरातील पाणी एकत्र करून ते नहरीच्या माध्यमातून क्रांती चौक, कोटला कॉलनीपर्यंत आणले गेले.
0 नहर-ए-बेगमपुरा : जटवाडा आणि ओव्हरच्या डोंगरातील पाणी बेगमपुरा, मकबरा, जयसिंगपुरा, थत्ते हौदापर्यंत पोहोचवले गेले. या नहरीला ‘गोमाजी की’ नहर असेही म्हणतात.
0 नहर-ए-पळशी : पळशी येथे पाण्याचे एकत्रीकरण करून ते बायजीपुर्‍यापर्यंत आणले. काश्मीरच्या नेहरुम्मा नसरीन ऊर्फ बायजीबाई यांच्या बायजीपुर्‍यातील महालापर्यंत नहर आणली गेली.

0 नहर-ए-नसरुल्ला : औरंगजेबाच्या काळात चौका ते रोशनआरा, हसरूल परिसरात ही नहर आणली
0 नहर-ए-दल बादल : गारखेडा परिसरात या नहरीचे अस्तित्व आहे. उस्मानपुरा पोलिस चौकीसमोरील बंब याच नहरीचा आहे.
0 नहर-ए-गांधेली : गांधेली ते शहानूरमिया चौसर बाग परिसरात ही नहर आलेली आहे.
0 नहर-ए-सातारा : सातारा परिसराच्या डोंगरातून ही नहर नूतन कॉलनी परिसरात आणली गेली.
0 नहर-ए-पाणचक्की : शहरातील मोठी नहर म्हणून ही ओळखली जाते. खाम नदी आणि हर्सूलच्या तलावापासून ही नहर आरेफ कॉलनी आणि पाणचक्कीपर्यंत तयार करण्यात आली.
0 नहर-ए-छावणी : छावणी परिसरातील ही नहर ब्रिटिशांच्या काळात तयार करण्यात आली आहे. लोखंडी पाइपचा वापर करून ही नहर तयार करण्यात आली आहे.
नहरींची डागडुजी करणे शक्य

शहरातील विविध ठिकाणी असलेल्या नहरींची डागडुजी करणे शक्य आहे. त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर निधीची आवश्यकता नाही. केवळ प्रशासनाचे सहकार्य आणि लोकसहकार्य अपेक्षित आहे. मोगल काळातील इंजिनिअरिंगचा हा अद्भुत नमुना आहे. आजही तो शहरातील मोठय़ा भागाची तहान भागवण्यास सक्षम आहे.’’ अजय कुलकर्णी, आर्किटेक्ट

लोकांनी मानसिकता बदलायला हवी
या नहरी मुस्लिम राज्यकर्त्यांच्या काळात तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्या केवळ मुस्लिम सत्तेचे प्रतीक असल्याचे मानले जाते. ही मानसिकता बदलून नहर म्हणजे देशाचा वारसा आहे. ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. देशात केवळ औरंगाबादलाच अशा नहरी आहेत.’’ खालीद अहमद, सचिव, हिस्ट्री अकॅडमी
पर्यटनाच्या दृष्टीने विकास व्हावा

ओमान आणि इटली या देशातील प्रशासन व नागरिकांनी नहरींचे अस्तित्व टिकवून त्यांना विकसित केले आहे. त्यामुळे शेकडो वर्षांनंतरही त्या सुस्थितीत आहेत. मात्र, आपल्या शहरात तसे नाही. नहरींचे शहर म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर औरंगाबादची ओळख निर्माण होऊ शकते.’’ चंद्रशेखर जैस्वाल, वरिष्ठ व्यवस्थापक, एमटीडीसी, औरंगाबाद