वैजापूर - राज्य सरकारने तालुक्यातील औद्योगिक विकासाला भरीव चालना देण्यासाठी रोटेगाव, आघूर, जरूळ येथे एमआयडीसी उभारणीसाठी संपादित केलेल्या जमीन क्षेत्रावर प्रकल्प कार्यान्वित करावे, या प्रमुख मागणीसाठी माजी अतिरिक्त उद्योग संचालक तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जे.के. जाधव यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (23) सकाळी 11 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
औद्योगिक विकास महामंडळाने 1992-93 या वर्षात वैजापूर तालुक्यात एमआयडीसी उभारण्यासाठी रोटेगाव, जरूळ, आघूर या तीन गावांतील 1100 एकर शेतजमीन या प्रकल्पासाठी संपादित केलेली आहे. जवळपास 20 वर्षांचा कालावधी लोटला असताना या ठिकाणी औद्योगिक वसाहतीसाठी केवळ जमीन भूसंपादनाच्या कारवाई पलीकडे काहीच झाले नाही. त्यामुळे वैजापूरकरांना एमआयडीसी प्रकल्प कधी कार्यान्वित होईल याची प्रतीक्षा करावी लागत आहे.
याकडे राज्य सरकारने लक्ष देऊन एमआयडीसी कार्यान्वित करावी, या मागणीसाठी सोमवारी उपविभागीय कार्यालयासमोर मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देणार असल्याचे काँग्रेस नेते जे.के. जाधव यांनी सांगितले.