आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद: जबिउद्दीन अन्सारी ऊर्फ अबू जिंदालला पकडण्यात यश आल्यानंतर वेरूळ शस्त्रसाठा प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्यात यश येईल, अशी महाराष्ट्र एटीएसला आशा वाटत आहे. या प्रकरणातील फरार आरोपी फय्याज कागजी आणि एजाज यांचा थांगपत्ता जबीकडून लागू शकतो. तसेच वेरूळला आणलेला शस्त्रसाठा कुठून आला, कुणी आणला, कुठे आणि कुणाकडे जाणार होता या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील.
वेरूळ घाटातील शस्त्रसाठा प्रकरणातील सहा जणांना एटीएसने अटक केली असली तरी ज्याच्या इशार्यावर शस्त्रांची वाहतूक झाली तो जबी मात्र हाती लागला नाही. त्याचा साथीदार फय्याज कागजी आणि एजाज हेदेखील पसार झाले. एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फय्याज कागजीदेखील लष्कर-ए-तोयबाच्या फळीत सक्रिय आहे. एजाजदेखील त्याच्यासोबत असावा असा कयास आहे. जबी आणि फय्याज कागजी हे दोघेही जानी दोस्त. बीडपासून ते एकमेकांसोबत होते. एजाज हा फय्याज कागजीच्या परिचयाचा आहे. तोदेखील बीडचा आहे. शस्त्रसाठा प्रकरणानंतर मुंबईतील लोकलमध्ये झालेले बॉम्बस्फोट, दिल्लीतील जामा मशिदीसमोरील गोळीबार, जर्मन बेकरी या प्रकरणांमध्ये पकडलेल्यांकडून जबिउद्दीनचा वारंवार उल्लेख झाल्याने तो एटीएस, आयबी आणि रॉच्या रडारवर आला. याच काळात फय्याज कागजी आणि एजाज यांचा मात्र थांग लागू शकला नाही. पण ते दोघेही पाकिस्तानात असावेत असा एटीएस आणि गुप्तचर संस्थांचा कयास आहे. लष्कर-ए-तोयबा, इंडियन मुजाहिदीनसाठी जिहादी तरुणांची भरती आणि निधी संकलन या कामासाठी जबी सौदी अरेबिया आणि आखाती देशांत पाकिस्तानी पासपोर्टवर जाऊन आला आहे. तेथून तो भारतातील नेटवर्क सांभाळून होता, असेही सूत्रांनी सांगितले.
शस्त्रसाठय़ाचे गौडबंगाल
वेरूळला पकडलेली शस्त्रे नेमकी कुठून, कशी आली, त्यासाठी कोणते नेटवर्क वापरले गेले, हा साठा कुणापर्यंत पोचवला जाणार होता हे कळीचे प्रश्न एटीएसच्या दृष्टीने आजपर्यंत अनुत्तरित आहेत. अटकेत असलेल्या आरोपींकडून जी काही माहिती हाती आली त्यापेक्षा अधिक माहिती जबीकडून हाती लागण्याची खात्री आहे. या शस्त्रसाठय़ामागील अतिरेकी संघटनांचे नेटवर्क त्याच्याकडून कळू शकते. या प्रकरणात अटकेत असलेल्या महंमद आमीरसोबत जबीची फेस टू फेस चौकशी करण्याची एटीएसची इच्छा आहे. याच आमीरने लष्कर ए तोयबाचा खतरनाक अतिरेकी अस्लम काश्मिरीची आणि जबीची भेट घडवून आणली होती. गुजरात दंगलीनंतर गुजरातेतील मुस्लिम तरुणांना लष्कर ए तोयबा आणि इतर कट्टरवादी संघटनांकडे आकृष्ट करण्याचे काम या अस्लम काश्मिरीने केले होते. आमीरने त्याला औरंगाबादेत आणले होते असे एटीएसच्या सूत्रांनी सांगितले.
जबीउद्दीन अन्सारीच्या ओळखीबाबत संशय ; डीएनए चाचणीवरही सवाल!
'अटकेतील अबू जिंदाल माझा मुलगा नाही, जबीउद्दीन दहशतवादी असू शकत नाही'
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.