आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jagannath Ugale Acting In Maher Tuz Ghar Maz Movie

वडापाववाले मामा झाले खलनायक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('माहेर तुझं, घर माझं...’ या चित्रपटाच्या चित्रीकरणप्रसंगी अभिनेते रवी पटवर्धन. सोबत पाटील मामा वडापाववाले.)
औरंगाबाद- एखाद्या गोष्टीच्या मागे झपाट्याप्रमाणे लागले तर ती तुम्हाला मिळतेच, याची प्रचिती न्यू विशालनगरातील रहिवासी जगन्नाथ उगले (पाटील मामा वडापाववाले) यांच्याकडे पाहिल्यानंतर येते. चित्रपटात काम करण्याची इच्छा असल्याने त्यांनी प्रसंगी स्वयंपाकी, स्पॉटबॉय अशी अनेक कामे केली आणि चित्रपटात भूमिका करण्याचे स्वप्न पूर्ण केले. दहा वर्षांपासून ते खलनायकाची भूमिका अगदी सरसपणे करत आहेत.
मूळ शेगाव येथील उगले यांनी पहिल्या वर्गापर्यंतच शिकून शाळा सोडली. ते २२ वर्षांचे असताना चित्रपटात काम करण्याची आवड निर्माण झाली. खिशात पैसे नसताना अभिनेता होण्याचे स्वप्न बाळगून त्यांनी मुंबई गाठली. अमिताभ बच्चन यांना पाहण्यासाठी ते दोन दिवस त्यांच्या बंगल्यासमोर उभे राहिले. त्याच दरम्यान त्यांना शूटिंगच्या ठिकाणी स्वयंपाकी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. सहा वर्षे मुंबईत राहून त्यांनी चित्रपटनगरीला जवळून अनुभवले.
वडापावने दिली ओळख
मुंबईहून औरंगाबादेत आल्यानंतर त्यांनी विविध हॉटेलमध्ये वेटरचे काम केले; परंतु चित्रपटात काम करण्याची आवड कायम होती. याच वेळी त्यांनी पुंडलिकनगर रोडवर पाटील मामा वडापाववाले या नावाने वडापाव विक्री करण्यास सुरुवात केली आणि त्यांची ओळख वडापाववाले अशी झाली. दिग्दर्शक बाबू भट वडापाव घेण्यासाठी आले असताना त्या वेळी पाटील मामांकडे पाहून चित्रपटात काम करणार का, अशी विचारणा केली आणि त्यांनी तत्काळ होकार दर्शवला.
स्वप्नपूर्ती
रवी पटवर्धन यांच्यासोबत काम करण्याची संधी : उगलेयांना अभिनेते रवी पटवर्धन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. ‘माहेर माझं घर तुझं’ या चित्रपटात भुजंगरावची भूमिका ते साकारत असून फिरोज आशिक लिखित हा चित्रपट आहे.
विविध चित्रपटांत भूमिका
उगले यांना "शिक्षा अभियान - सक्सेस' या चित्रपटात ठेकेदाराची भूमिका मिळाली. भारदस्त आवाज, पाटिलकी अन् खलनायकला शोभेल असा चेहरा पाहून त्यांना चित्रपटात खलनायकाच्या भूमिका मिळत गेल्या. त्यांनी "बम चिक्की चिक्की बम' यात चहावाला, "एक और फरेब', "माहेर माझं घर तुझं', "साक्षात्कार दत्ताचा', "मिशन औरंगाबाद', "आई मला वाचव', "औरंगाबाद टू जालना', "गोफण', "अन्यायाचा प्रतिशोध', "जाणीव', "वरदान', "तौलक', "लय भन्नाट' अशा अनेक चित्रपटांत काम केले.