आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरीप्रश्नी सरकारला जागे करण्यासाठी जागरण-गोंधळ!, शेतकरी कामगार पक्ष, बालाघाट विकास आघाडीचे पाटोद्यात अनोखे आंदोलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटोदा- वारंवार खेटे घालून व लोकशाही मार्गाने अनेक आंदोलने करूनही सन २०१५-१६ मध्ये मंजूर झालेला रब्बी पीक विमा शेतकऱ्यांना मिळत नसल्याच्या निषेधार्थ  शेतकरी कामगार पक्ष व बालाघाट विकास आघाडीच्या वतीने पाटोदा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सोमवारी जागरण-गोंधळ घालत अनोखे आंदोलन करण्यात आले.  

सोमवारी सकाळी साडेअकराची वेळ. उपविभागीय कार्यालय परिसरात नेहमीप्रमाणे गर्दी झालेली. यातच शेतकरी कामगार पक्षाचे नेते विष्णुपंत घोलप, नारायण थोरवे, बाळासाहेब भोंडवे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर जागरण-गोंधळ आंदोलन सुरू झाले. ज्वारीच्या पाच ताटांच्या मांडवाखाली वाघ्या, मुरळीच्या गीतांना सुरुवात झाली. टाळ, तुणतुण्याची साथ होतीच. पीक विम्याच्या प्रतीक्षेतील शेतकरी मांडवाखाली बसून गोंधळात सहभागी झाले. हे अनोखे आंदोलन पाहण्यासाठी नागरिकांचीही गर्दी झाली. 

अखेर उपविभागीय अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी आंदोलकांशी चर्चा करत त्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले. प्रशासनाने यापुढेही मागण्या मान्य न केल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू, असा इशाराही घोलप यांनी दिला. या वेळी नारायण थोरवे, बाळासाहेब भोंडवे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बाळासाहेब जायभाय, गोरख झेंड,  सय्यद अशरफ अली, अरुण येवले, सुनील तांबे, रवींद्र अडागळे, सय्यद ताहेर, शहीर भुजंगराव खाडे, तुकाराम पोकळे, भागवत नागरे, दादाराव घोशीर, कंकरसिंग टाक, अण्णा निंबाळकर, संतोष कवठेकर, आबासाहेब भाेसले, त्र्यंबक पठाडे, बबन हुलजुते, सय्यद अलीम, संजय जावळे आदींसह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 
या होत्या मागण्या  
पीक विमा तत्काळ वाटप करण्याच्या मागणीसह सन २०१५ च्या राष्ट्रीय कृषी योजनेतून शासनाने जाहीर केलेल्या फळ पीक पुनरुज्जीवनाचे शेतकऱ्यांचे पैसे तातडीने वाटप करावेत, रोजगार हमी योजनेच्या मजुरांना ३०० रुपयांऐवजी ५०० रुपये मजुरी द्यावी, शासनाने मंजूर केलेले ५०० कोटींचे कोल्हापुरी  बंधारा व सिमेंट नाला बंधाऱ्याची एक हजार १३० कामे तत्काळ सुरू करावीत, वाडी वस्ती व प्रत्येक ग्रामपंचायतीच्या हद्दीत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेची कामे तत्काळ सुरू करा, प्रधानमंत्री पीक विमा योजनेत बदल करून कर्जदार सभसदाचा पीक विमा पेऱ्यानुसार विमा भरण्यात यावा, सन २०११ ते २०१४ सालातील पूर्णत्वाचे दाखले दिलेल्या पाटोदा व बीड तालुक्यातील एक हजार ५० मनरेगा कामांंतर्गत झालेल्या विहिरींच्या कुशल व अकुशल कामाचा मोबदला तत्काळ द्यावा, आदी मागण्यांसाठी हे अांदोलन करण्यात आले. 

पालकमंत्र्यांच्या घरासमोर केले अनोखे आंदोलन
लातूर
-शेतकऱ्यांच्या  विविध मागण्यांसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या येथील घरासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जगरण- गोंधळ घालून आंदोलन केले. कर्नाटक सरकार प्रमाणे तुरीला प्रति क्विंटल हजारांचे अनुदान देऊन सहा हजार दराने खरेदी करावी, मुख्यमंत्र्यांनी पेरणीला दिलेला अनुदानाचा शब्द पाळावा, सोयाबीन आयातीवर निर्बंध घालून त्याला हमी भाव द्यावा आदी मागण्या केल्या.
बातम्या आणखी आहेत...