आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jagriti Women Forum Filed PIL In Court For The Baning The Hordings

होर्डिंग्जवर बंदीसाठी जागृती महिला मंचाची न्यायालयात याचिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - औरंगाबाद शहराला विद्रूप करणार्‍या भाऊ, दादांच्या वाढदिवस होर्डिंग्जवर कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी विनंती करणारी याचिका जागृती महिला मंचने उच्च न्यायालयात बुधवारी (दहा एप्रिल) दाखल केली आहे. न्यायालयाने यापूर्वी आदेश देऊनही होर्डिंग्जविषयी महापालिका धोरण निश्चित करत नाही. त्यासाठी स्पष्ट निर्देश द्यावेत आणि धोरण जाहीर करण्यास भाग पाडावे, असेही याचिकेत म्हटले आहे.

18 मार्च रोजी झालेल्या मनपाच्या सभेत होर्डिंग्जमुळे शहराचे झालेले विद्रूपीकरण, मनपा प्रशासनाची बेपर्वाई आणि पोलिस आयुक्तांनी केलेल्या कारवाईविषयी चर्चा झाली. मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी होर्डिंग्जविषयी विशेष धोरण जाहीर केले जाणार आहे, असे सांगितले. यासाठी पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांच्यासोबत बैठक होणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते. प्रत्यक्षात ती फक्त घोषणाच ठरली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 12 ते 14 एप्रिल कालावधीत अधिकृत जागी होर्डिंग्ज लावण्याची परवानगी देण्याचा निर्णय झाला. पण होर्डिंग्जचा आकार काय असावा, ते विनापरवानगी लावण्यावर कुणी-कधी कारवाई करावी, होर्डिंग्जवर परवाना क्रमांक नमूद करण्याची जबाबदारी कुणावर आहे, याविषयी ठोस निर्णय झालाच नाही. त्यामुळे जागृती मंचचे पदाधिकारी प्रा. भारती भांडेकर, विद्या पाटील, हेमलता पाटील, तारा बसोले आदींनी अँड. कल्पलता पाटील भारस्वाडकर यांच्यामार्फत याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला.

पोलिस आयुक्तांनी उगारला होता बडगा : यासंदर्भात जागृती मंचने पोलिस आयुक्त संजयकुमार यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांनी मनपाला कारवाईची सूचना केली, पण त्याकडे दुर्लक्ष झाल्यावर संजयकुमार यांनीच पोलिसांचे पथक नेमून होर्डिंग्ज जप्त केले होते. त्यानंतर मनपाने मोहीम राबवली.


डोक्यावर नाही, डोक्यात घ्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वत:च मूर्तिपूजा किंवा वैयक्तिक निष्ठा जोपासण्यास विरोध केला आहे. त्यामुळे बाबासाहेबांना डोक्यावर घेण्याऐवजी डोक्यात घेणे गरजेचे आहे. भीषण दुष्काळातच नव्हे, तर एरवीदेखील होर्डिंग्ज आदींवर अनावश्यक खर्च करण्यापेक्षा त्यांच्या विचारांची पुस्तके वितरित करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चात योगदान दिले तर अधिक उपयुक्त आहे. - देवानंद वानखेडे, रिपाइं ज्येष्ठ कार्यकर्ते


उदासीनतेमुळे कोर्टात
न्यायालयाने आदेश देऊनही मनपा धोरण ठरवत नाही. शहर विद्रूप करणार्‍या होर्डिंग्जवर कारवाई करत नाही. त्यामुळेच आम्ही तमाम सुजाण, सुसंस्कृत आणि औरंगाबाद शहरावर प्रेम असणार्‍या नागरिकांतर्फे न्यायालयात याचिका दाखल केली आहे. -प्रा. भारती भांडेकर, अध्यक्ष, जागृती मंच

दुष्काळग्रस्तांना मदत करा
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त डिजिटल बॅनर, होर्डिंग्जवर लाखो रुपये खर्च केले जातात. ही रक्कम दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी दिली तर गोरगरिबांना दिलासा मिळेल. -रतनकुमार पंडागळे, अध्यक्ष, बहुजन टायगर फोर्स
सध्या काय सुरू आहे ? : डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्ताने कार्यकर्त्यांना होर्डिंग्ज लावण्याची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव नगरसेवक कृष्णा बनकर यांनी 18 मार्चच्या सभेत मंजूर करून घेतला. त्यानुसार मालमत्ता विभागाकडे 60 अर्ज आले आहेत. मनपाने निश्चित केलेल्या जागेवरच होर्डिंग लावण्याची परवानगी दिली जाणार आहे, असे मालमत्ता अधिकारी एस. पी. खन्ना यांनी सांगितले.

मंचच्या इशार्‍यानंतर तनवाणींनी काढले होर्डिंग्ज

आमदार तनवाणी यांचे बंधू राजू तनवाणी यांचा सहा एप्रिलला वाढदिवस होता. त्यांच्या कार्यकर्त्यांनी हॉटेल रॉयल पॅलेससमोर व सेव्हन हिल्स उड्डाणपुला शेजारी लावलेले होर्डिंग 10 एप्रिलपर्यंत तसेच होते. याबद्दल जागृती मंचच्या प्रा. भारती भांडेकर यांनी त्यांच्याशी संपर्क साधून पोलिसांत तक्रारीचा इशारा दिला. तेव्हा असे काही होर्डिंग लावल्याचे मला माहीतच नाही, असे तनवाणी यांनी सांगितले आणि गुरुवारी दुपारी ते काढले.