आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जायकवाडीत दोन महिन्यांचाच साठा, पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - मराठवाड्यासाठी वरदान ठरलेल्या जायकवाडी धरणात केवळ साडेचार टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा दोन महिने पुरेल एवढाच असून पावसाने ओढ दिल्यास आगामी काळात भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रोहिणी, मृग ही नक्षत्रे कोरडी गेल्याने चिंता वाढली आहे.

मराठवाड्यात अद्यापही दमदार पावसाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, अहमदनगरसह बीड जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्‍या जायकवाडी धरणाचा जलसाठा आजघडीला 4.65 टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. जायकवाडीत उपलब्ध असलेले हे पाणी केवळ दोन महिने पिण्यासाठी पुरेल. त्यानंतर या पाचही जिल्ह्यांना पाणीटंचाईची समस्या भेडसावू शकते. 300 पेक्षा अधिक गावांना प्रामुख्याने पाणीपुरवठा जायकवाडीतून होतो. याशिवाय याच पाण्यावर पाच जिल्ह्यांतील सुमारे 1 लाख 83 हजार 322 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. तर साडेतीन हजार लहान-मोठ्या उद्योगांनाही पाणीपुरवठा करण्यात येतो. या वर्षी पाऊस वेळेवर होईल, या आशेने धरणात उपलब्ध 33 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असताना पाटबंधारे विभागाने डाव्या व उजव्या कालव्यातून दोन वेळा सिंचनासाठी 5 टीएमसीपेक्षा जास्त पाणी सोडले. त्यामुळे पाणीसाठा थेट 5 टक्क्यांवर आला. शिवाय रोज बाष्पीभवनातून 1 दलघमी पाणी कमी झाल्याने आज पाणीसाठा साडेचार टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. या धरणाच्या वरील भागात पाऊस न पडल्यास तसेच त्यातून पाणी न सोडल्यास या जायकवाडी धरणाची पाणीपातळी मृतसाठ्यात येईल.

नियम डावलून दिले सिंचनाला पाणी
धरणातील पाणीसाठा 33 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास सिंचनासाठी पाणी देण्याची तरतूद आहे. 33 टक्क्यांचा टप्पा गाठलेला नसतानाही डाव्या व उजव्या या दोन्ही कालव्यांतून सिंचनासाठी पाणी कालव्यात सोडण्यात आले. त्यामुळे 5 टीएमसीपेक्षा जास्त पाणी धरणातून गेले. त्यातही दिलेल्या पाण्यातून केवळ 40 हजार हेक्टर क्षेत्रालाच फायदा झाला. या पाण्यामुळे दीड लाख क्षेत्रही ओलिताखाली आले नाही.

पाणी कपातीची गरज नाही
दोन महिने धरणात उपलब्ध असलेले पाणी पिण्यासाठी पुरेल. हे पाणी केवळ पिण्यासाठी ठेवण्यात आले असून अद्यापही पाणी कपातीची गरज नाही.
संजय भर्गोदेव, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग