आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडी अजुनही शून्यावरच, दीडशे दिवसांपुरते पाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरी जायकवाडीच्या नाथसागरातील पाणीसाठा अजूनही शून्य टक्केच आहे. सध्याचा मृतसाठा औरंगाबाद शहराला दीड वर्ष पुरेल एवढा आहे. तर सध्या धरणात आलेले 113 दलघमी उपयुक्त पाणी दीडशे दिवसच तहान भागवू शकेल. शहराला दररोज 0.15 दलघमी पाणी लागते.
तीन दिवसांपासून 20 ते 22 दलघमीचा ओघ सुरू असल्याने पाणीसाठा 688.08 दलघमीवर गेला आहे. नाशिक परिसरात अद्याप अपेक्षित पाऊस झाला नसल्याने धरण भरण्यास काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

नांदूर-मधमेश्वरमधून 7900 क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी वाढत आहे. मंगळवारी दिवसभरात 23 दलघमी पाणी जायकवाडीत आले. मात्र, मृतसाठा भरण्यासाठी 50 दलघमी पाण्याची आवश्यकता आहे. जूनपासून आतापर्यंत 113 दलघमी पाणी आले आहे. सध्या उपलब्ध असलेला साठा औरंगाबाद शहराला एक ते दीड वर्ष सहज पुरू शकेल. अ‍ॅप्रोच कॅनॉलमुळे तशी पाणीटंचाई जाणवणार नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


गंगापूर 65, दारणा 74%
नाशिक । तीन दिवसांच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील गंगापूर धरणात 65, तर दारणा धरणात 74 टक्के पाणीसाठा झाला आहे. शहरासह जिल्ह्यात पाऊस सुरू असून, शनिवारपर्यंत त्याचा जोर वाढण्याचा अंदाज इगतपुरी केंद्राने वर्तवला आहे. जिल्ह्यात 53 टक्के पाऊस झाला आहे.

मुळा 49, भंडारदरा 62%
नगर । नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे मुळा धरण 49, तर भंडारदरा 62 टक्के भरले आहे. यंदा 3,664 मि.मी. पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत तो 2,033 मि.मी. अधिक आहे. 11 टीएमसी क्षमतेच्या भंडारदरात 6,895 दलघफू (62 टक्के), तर 26 टीएमसी क्षमतेच्या मुळा धरणात 12,980 दलघफू (49 टक्के) साठा होता. मुळाचे दरवाजे बंद केले आहेत. निळवंडेत 1,286 दलघफू साठा होता.