आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अडीच वर्षांपासून पाणी नाही तरीही मराठवाडा शांत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जायकवाडीच्या हक्काचे पाणी पळवण्याचा प्रकार गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. दोन दिवस पाणी बंद केल्यानंतर नगर जिल्ह्यातील पुढारी आणि नागरिकांनी आकांडतांडव केले. मात्र, मागील अडीच वर्षांपासून मराठवाड्याला सिंचनासाठी पाणी सोडण्यात आलेले नाही, तरीही मराठवाडा शांत आहे. विशेष म्हणजे जायकवाडी धरणाच्या वरच्या भागातील धरणांत 80 टक्क्यांपेक्षा अधिक पाणी असतानाही जायकवाडीच्या हक्काचे पाणी नांदूर-मधमेश्वर कालव्यातून वळवले जात आहे. त्यामुळे जायकवाडीचा सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असतानाही जायकवाडीच्या हक्काचे पाणी नगर जिल्ह्याकडे वळवण्यात येत आहे. नांदूर-मधमेश्वरच्या डाव्या आाणि उजव्या कालव्यातून सलग चौथ्या दिवशी 770 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. डाव्या कालव्यातून 320 आणि उजव्या कालव्यातून 450 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. कालव्यातून सोडण्यात येणार्‍या पाण्यातून पाझर तलाव, शेततळे, विहिरी भरून घेतल्या जात आहेत. मात्र, जायकवाडीसाठी लागणारे हक्काचे पाणी सोडण्यात येत नाही.

एक लाख 83 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाविना
जायकवाडी धरण 33 टक्क्यांपेक्षाअधिक भरल्यानंतर त्यामधून सिंचनासाठी पाणी सोडले जाते. मात्र, 33 टक्क्यांच्या खाली पाणी असल्यास ते बिगरसिंचनासाठी ठेवण्याचा नियम आाहे. साधारणत: जायकवाडी धरणातील पाण्यावर 1 लाख 83 हजार हेक्टरवर सिंचन केले जाते. औरंगबाद, जालना, परभणी जिल्ह्यास डाव्या कालव्यातून, तर उजव्या कालव्याच्या माध्यमातून बीड आणि नगरच्या काही भागाला पाणी पुरवले जाते. डाव्या कालव्यातून 1 लाख 41 हजार 640 हेक्टर, तर उजव्या कालव्यातून जवळपास 42 हजार हेक्टर सिंचन केले जाते. धरण साठा 33 टक्क्यांच्या वर असल्यास रब्बीमध्ये चार रोटेशन आाणि उन्हाळी हंगामात कमीत कमी चार ते सहा रोटेशन (पाणी पाळ्या) पाणी सिंचनासाठी सोडले जाते.

न्यायालयाने पाणी सोडायला सांगितले तरी पश्चिम महाराष्ट्रातले पुढारी पाणी सोडत नाहीत. जिसकी लाठी उसकी भैंस हा प्रकार सुरू आहे. कैलास तवार, शेतकरी संघटना

जायकवाडीच्या बाबतीत मराठवाड्यातले नेते अज्ञानी आहेत. जनतेच्या पाण्यासाठी संघर्ष करण्याची मानसिकता येथील राज्यकर्त्यांमध्ये नाही. विजय दिवाण, जलतज्ज्ञ

मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होणार आहे
22 जुलैला परभणीत शिवसेनेने जायकवाडीचे पाणी सोडण्यासाठी आंदोलन केले. मराठवाड्याचे आमदार मुख्यमंत्र्यांना भेटले असून उद्या चर्चा होणार आहे. संजय जाधव, आमदार, शिवसेना, परभणी