आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत टोलवाटोलवी, आर. आर. म्हणतात, अजितदादा बघतील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, अशी मागणी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी राष्ट्रवादीच्या विभागीय कार्यकर्ता मेळाव्यात आक्रमकपणे केली खरी; पण प्रदेशाध्यक्ष, गृहमंत्री आर.आर. पाटील, ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी अक्षरश: टोलवाटोलवी केली. पाणी देतो, असे कोणीही म्हटले नाही.

हक्काचे पाणी, शेतकर्‍यांची तोडली जाणारी वीज, या मुद्दय़ांवर टोपे आक्रमकपणे बोलले. ‘पाणी मिळेल’ अशी घोषणा होईल, अशी उपस्थित कार्यकर्त्यांची अपेक्षा फोल ठरली. पाणी देण्यास कडाडून विरोध करणारे आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड टोपे यांच्यानंतर लगेचच बोलण्यास उभे राहिले. ‘गतवर्षी शरद पवार साहेबांच्या सांगण्यावरून पाणी दिले होते’ एवढेच वक्तव्य त्यांनी केले. यंदा देणार की नाही, यावर बोलणे टाळले.

त्यानंतर प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी यावर भाष्य केले नाही. प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी याबाबत शरद पवार काय तो निर्णय घेतील, असे सांगून विषय संपवला.

आर. आर. पाटील यांनी जायकवाडीबाबत बोलताना आमचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांच्या कानी भावना पोहोचवू, तेच निर्णय घेतील, असे सांगितले. छगन भुजबळ भाषणासाठी उभे राहिले तेव्हा कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणासाठी घोषणा दिल्याने त्यांचा भाषणाचा सूर लागला नाही. तरीही त्यांनी या मुद्दय़ाला बगल न देता पाणी कमी पडू दिले जाणार नाही, असे सांगितले.