आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळी शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा, महावीर जयंती कार्यक्रमातील अनावश्यक खर्चाला फाटा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महावीर जयंतीदिनी काढण्यात येणारी मिरवणूक अन्य कार्यक्रमांवर होणारा खर्च टाळून त्यातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना चारा उपलब्ध करून देण्याचा निर्णय सकल जैन समाजाच्या वतीने घेण्यात आल्याचे सकल जैन समाजाचे उपाध्यक्ष प्रशांत देसरडा यांनी स्पष्ट केले.
महावीर जयंतीनिमित्त दरवर्षी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येते. अन्नदान तसेच विविध कार्यक्रमांवरही खर्च करण्यात येतो. परंतु सलग तिसऱ्या वर्षी मोठा दुष्काळ असल्याने जैन समाजाने यंदा भव्यदिव्य कार्यक्रम घेण्यास नकार दिला आहे. काही कार्यक्रम होतील, परंतु त्यात खर्च होणार नाही. कार्यक्रमांवर खर्च करण्यापेक्षा हा निधी शेतकऱ्यांच्या कामी कसा येईल याचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या जनावरांना चाऱ्याची गरज आहे. त्यामुळे समाजबांधवांनी शेतकऱ्यांना चारा उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आतापर्यंत ३४ जणांनी प्रत्येकी ट्रक चारा उपलब्ध करून दिला आहे. जयंतीला आणखी चार दिवसांचा अवधी आहे. या काळात हा आकडा किमान ५१ पर्यंत पोहोचेल, असा विश्वास देसरडा यांनी व्यक्त केला.

चाऱ्याचेट्रकही मिरवणुकीत : भगवानमहावीर यांच्या जयंती मिरवणुकीत चाऱ्याचे ट्रकही सहभागी झालेले असतील. सकाळी १० वाजेनंतर हे ट्रक शेतकऱ्यांकडे रवाना होतील. अनेक समाजबांधवांनी प्रत्येकी ११ हजार रुपये समाजाकडे जमा करून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हातभार लावला आहे. यातून आणखी काही निधी जमा झाला तर त्यातून पाणी उपलब्ध करून देण्याचा उपक्रमही हाती घेतला जाणार आहे.

यांचा पुढाकार : भगवानमहावीर जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष मदनलाल अच्छा, विनोद बोकाडिया, चांदमल सुराणा, महावीर पाटणी, विलास सावजी, मंगल पारख, विकास जैन या मंडळींनी पुढाकार घेतला आहे.

आणखी मदत करण्याचा विचार
^वायफळ खर्चाला फाटा देऊन शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय आम्ही घेतला. आम्ही एक फोन केला तर समोर मदतीसाठी दोघे राजी झाले. यापेक्षा आणखी काही मदत करण्याचा विचार आम्ही करत आहोत. प्रशांत देसरडा, उपाध्यक्ष,सकल जैन समाज.