औरंगाबाद-हडको एन-11 मधील जैन मंदिरातून आठ मूर्तींसह तीन लाखांचा ऐवज गुरुवारी पहाटे दोन ते अडीचच्या दरम्यान चोरट्यांनी लांबवला. तीन दिवस मंदिरावर पाळत ठेवणार्या तीन युवकांनीच चोरी केला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मागील वर्षभरात जैन मंदिरातील ही चौथी चोरी आहे. तथापि, येथे सीसीटीव्ही कॅमेरे लावले नसल्याने चोरट्यांचे फावले. मंदिराच्या वर्धापनदिनीच चोरी झाल्याने जैन समाजबांधवांनी निषेध व्यक्त केला आहे.
हडकोमध्ये दोन मजली इमारतीत मंदिर आहे. दररोज सकाळी सात वाजता हे मंदिर उघडते आणि रात्री 8.30 वाजता बंद होते. गुरुवारी मंदिराचा आठवा वर्धापन दिन असल्याने दुसर्या मजल्यावर काही जैन साधू आणि सेवेकरी मुक्कामी होते. पहाटे दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान दरवाजा तोडण्याचा आवाज आल्याने काही सेवेकरी तळमजल्यावर आले. तेव्हा मंदिरातील आठ मूर्ती गायब असल्याचे आणि दोन कपाटे तोडलेली आढळली. सेवेकर्यांनी आजूबाजूच्या परिसरात पाहिले, परंतु तेथे कोणीही दिसले नाही. रात्री गस्तीवरील पोलिस वाहनाच्या मागे धावत त्यांनी सेवेकर्यांनी चोरीची माहिती दिली. त्याप्रमाणे सिडको पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवा ठाकरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वायरलेसवर रस्त्यावरून ये-जा करणार्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले. सिटी चौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक एन. एस. कोडे यांनी सिडको भागात गस्त वाढवली, परंतु चोरटे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. दरम्यान, मूर्ती चोरी झाल्याने गुरुवारी सकाळी 9.30 वाजता धर्मध्वज फडकावून मंदिराचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आधी पाळत, नंतर चोरी :
सोमवारी रात्री 10 ते 10.30 वाजेदरम्यान तीन युवक मंदिराच्या पायर्यांवर बसले होते. सलग दोन दिवस त्या युवकांनी मंदिरावर पाळत ठेवली होती. त्याच युवकांनी चोरी केल्याची माहिती एका प्रत्यक्षदर्शीने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. चोरट्यांपैकी एक जण काळ्या रंगाचा असून त्याचे केस वाढलेले होते. त्याने भुरकट रंगाचा टी-शर्ट घातला होता व त्याचे वय अंदाजे 20 वष्रे होते. दुसरा युवक सडपातळ असून त्याची दाढी वाढलेली होती. तो 29 वर्षांचा असेल, असा अंदाज त्या प्रत्यक्षदर्शीने वर्तवला.
नळाच्या पाइपने चॅनल गेट तोडले?
पोलिसांच्या संशयानुसार, नळाच्या पाइपने मंदिराचे चॅनल गेट आणि मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरी करण्यात आली आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी पाइपचा तुकडा जप्त केला आहे. 2008 मध्ये ज्या चोरट्यांनी या मंदिरात चोरी केली होती त्यांची पोलिस कसून चौकशी करत आहेत. पोलिस उपायुक्त अरविंद चावरिया यांच्यासह सर्व अधिकारी रात्री घटनास्थळी दाखल झाले होते. सकाळी सहा वाजेपर्यंत पोलिस चोरट्यांचा शोध घेत होते.