आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जैन, वाघचौरेंचा मिटमिट्यावर डोळा - हवालदिल बड्यांची मोर्चेबांधणीही सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरक्षणाच्या सोडतीत बेघर झालेले बडे नेते वाॅर्डाच्या चिंतेत असताना नव्याने तयार झालेल्या मिटमिटा वाॅर्डाने त्यांना घुसखोरीची संधी दिली आहे. रस्ते, पाणी, पथदिवे यासारख्या मूलभूत सुविधा नसलेल्या या वाॅर्डात माजी महापौर, माजी सभापती विकास जैन, विद्यमान सभापती विजय वाघचौरे यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात करीत स्थानिक इच्छुकांना केव्हाच मागे सारले आहे.

शहरापासून पाच किमी अंतरावर असणारा पडेगाव व मिटमिटा हे भाग आधी ग्रामपंचायतीत होते. नंतर हा भाग मनपाच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आला. या भागांचा आतापर्यंत एकच वाॅर्ड होता. पडेगावचा नगरसेवकच या परिसराचा कारभार पाहत असे. पण गेल्या काही वर्षांत या भागाची लोकसंख्या वाढली व नागरी सुविधांचीही गरज अधिक भासू लागली. आता नवीन वाॅर्डरचनेत पडेगावपासून मिटमिटा हा स्वतंत्र वाॅर्ड करण्यात आला आहे. सध्याच्या पडेगाव वाॅर्डाचे प्रतिनिधित्व शिवसेनेच्या सावित्रीबाई वाणी करतात. नवीन वाॅर्डरचनेनंतर झालेल्या आरक्षण सोडतीत शहरात प्रचंड उलथापालथी झाल्या व बड्यांचे वाॅर्ड त्यात गेले. त्यामुळे सर्वसाधारण संवर्गासाठी असलेल्या मिटमिट्यासारख्या नवीन वाॅर्डात नशीब आजमावावे या हेतूने बड्यांनी तिकडे धाव घेतली आहे. मिटमिटा वाॅर्ड सर्वसाधारण झाल्याने आकर्षणाचे केंद्र बनला आहे. विकास जैन, विजय वाघचौरे या दोघांनीही या वाॅर्डावर दावा केला आहे. परिणामी या ताकदवान नेत्यांसमोर स्थानिक पदाधिकारी कमजोर पडले असून त्यांना आपली इच्छा बाजूला ठेवावी लागते की काय अशी स्थिती झाली आहे.

इतर पक्षांतही अनेक इच्छुक
पडेगाव व मिटमिटा परिसरात वाणी कुटुंब मोठे आहे. त्यातीलच राजू वाणी हे काँग्रेसकडून तिकीट मागत आहेत, तर तरविंदरसिंग धिल्लनही निवडणूक लढवण्याच्या तयारीला लागले आहेत. फौजी ढाब्याचे चालक सतबीरसिंग रंधवा हेही तयारीला लागले आहेत. शिवाय शिवसेनेकडून दिलीप मुळे हेही स्थानिक असल्याचा फायदा घेत शर्यतीत उतरले आहेत.

शिरसाट समर्थक
जैन व वाघचौरे हे दोघेही आमदार संजय शिरसाट यांच्या जवळचे आहेत. दोघांनाही तिकिटाची खात्री आहे. जैन यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना जवळ करीत रोज वाॅर्डात ये -जा वाढवली आहे. दुसरीकडे वाघचौरे यांचे गणित वाॅर्डातील पाहुण्यारावळ्यांवर आहे. त्यांचाही दिवस आता मिटमिट्यातूनच सुरू होत आहे.

सध्या फक्त बैठका
या वाॅर्डात प्रचाराला सुरुवात झाली नसली तरी इच्छुक असलेल्या बड्यांनी बैठकांचे सत्र आरंभले आहे. काहींनी या भागातील पाण्याची समस्या ध्यानात घेत टँकरच्या फेऱ्या सुरू केल्या आहेत. दुसरीकडे आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी आपण हे करू, ते करू, अशी आश्वासनांची खैरात सुरू
केली आहे.