आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपने जयसिंगरावांना डावलले, दानवेंनी निमंत्रणच न पाठवल्याचे सांगत फेसबुकवर जाहीर खदखद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मराठवाड्यातील प्रतिस्पर्ध्यांचे पंख छाटणे सुरूच ठेवताना आता माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा भारतीय किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस जयसिंगराव गायकवाड यांना दुखावले आहे. शुक्रवारी भाजपची कोल्हापुरात प्रदेश कार्यसमितीची बैठक होती. त्याला प्रदेशाध्यक्षांनी निमंत्रणच न पाठवल्याने आपण जाणार नसल्याचे गायकवाड यांनी चक्क सोशल नेटवर्किंग साइटवर जाहीर करीत मनातील खदखद व्यक्त केली.

जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या गटाची ताकद खच्ची करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. आता त्यांनी मराठवाड्यात आपल्या तोडीचा मराठा नेताही कुणी नसावा, अशी चाल खेळल्याचे जाणवत आहे. त्यातूनच माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते व एकेकाळी गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्ती राहिलेले जयसिंगराव गायकवाड यांना डावलण्याचे काम सुरू केले आहे.

फेसबुकवर जाहीर नाराजी
पक्षात आपले खच्चीकरण होत असल्याने व बदलत्या समीकरणाने बाजूला फेकले गेल्याने नाराज झालेल्या गायकवाड यांनी आता आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. त्यांनी थेट शब्दांत ती व्यक्त करण्याऐवजी खूप संयत भाषा वापरली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांनी आज सकाळीच फेसबुकवर याबाबत सविस्तर टिपण पोस्ट केले आहे.

काय म्हणतात गायकवाड?
गायकवाड यांनी त्यात म्हटले आहे की, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बैठकीचे निमंत्रण न पाठवल्याने मी आजच्या कोल्हापुरात होत असलेल्या प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीला येऊ शकलो नाही. या बैठकीत शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य जनतेच्या हिताचे चांगले निर्णय घेतले जातील याची खात्री आहे. मी माननीय अध्यक्षांसह अापल्या बरोबर व आपल्या अंत:करणात होतो, आहे व राहील.

संतप्त प्रतिक्रिया
गायकवाड यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना अनेकांनी दानवे यांच्या कृतीचा धिक्कार केला आहे. संजय टाेणपे व सुनील क्षीरसागर यांनी निमंत्रण देणे गरजेचे होते, निष्ठावंतांना डावलले जाते आहे का, अशी शंका उपस्थित केली. तर भीष्माचार्य आव्हाड यांनी काका, तुम्ही आणि आम्ही घरी बसू, दादाच पक्ष चालवतील, अशी खोचक टिप्पणी केली आहे. अर्जुन दांडगे यांनी आता असेच होत राहणार, अनेकांना चकवे बसत राहतील, असा टोला लगावला आहे.
बातम्या आणखी आहेत...