आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्सुकता, उत्कंठेत पार पडली मनपा प्रभाग आरक्षण सोडत!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - ऑगस्टमध्ये होत असलेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी बहुपर्यायी सदस्यीय प्रभाग पद्धतीने आरक्षण सोडत काढण्यात आली. निवडणूक लढवायची असल्याने आपल्या प्रभागाचे आरक्षण नेमके काय? याबाबतची असलेली उत्सुकता प्रत्येकाच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होती. एकामागे एक आरक्षण जाहीर होऊ लागताच निवडणुकीचा मार्ग सुकर झाल्याने अनेकांनी टाळ्या व घोषणांनी आनंद व्यक्त केला. सुमारे दोन तासापर्यंत चाललेल्या या प्रक्रियेत सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मांडीला मांडी लावून बसलेले पाहायला मिळाले.

महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक आयोगाचे अधिकारी अतुल जाधव व उपायुक्त भालचंद्र बेहेरे यांनी आरक्षण सोडती काढल्या. आरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या प्रभाग क्रमांक असलेल्या चिठ्ठय़ा उपस्थितांना दाखवून काचेच्या ड्रममध्ये टाकल्या जात होत्या. सुरुवातीला उपायुक्त बेहेरे यांनी प्रभाग आरक्षणाची संपूर्ण माहिती उपस्थितांना दिली. जातीनिहाय प्रभागांमधील संख्या व उतरता क्रम याची माहिती दिली. त्यानंतर 37 प्रभागांमधील 75 नगरसेवकांच्या जागांसाठी आरक्षण सोडतीला दुपारी 12.45 वाजता सुरुवात झाली. अनुसूचित जाती या प्रवर्गाने सुरुवात करण्यात आली.

प्रोजेक्टरची होती व्यवस्था
पालिकेच्या सभागृहात राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाल्याने प्रत्येकाला आरक्षण सोडतीची माहिती सहज उपलब्ध व्हावी म्हणून दोन प्रोजेक्टरची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचप्रमाणे सोडतीनंतर प्रभागांची माहिती वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे.