आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा वर्षांनंतर झाला जलकुंभासाठी जागा योग्य नसल्याचा साक्षात्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील वाढीव भागात पाणीपुरवठा करण्यासाठी झालेल्या यादवनगरातील मनपाच्या जलकुंभासाठी ५० लाखांचा निधी मंजूर झाला. ठेकेदाराने काम सुरू केले. पण त्याला पैसे दिल्याने बीम टाकून त्याने सांगाडा उभा केला अन् काम अर्धवट सोडले. त्यानंतर कुणीही पाठपुरावा केला नाही. दहा वर्षांनंतर आता माती परीक्षण करून ही जागा जलकुंभासाठी योग्य नसल्याचा साक्षात्कार मनपाला झाला. आता या सांगाड्यांचा आधार घेऊन येथे मनपा झोन कार्यालय बांधण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे हडकोतील शेकडो वसाहती तहानलेल्याच राहणार आहेत.
शहरातील यादवनगर, नवजीवन कॉलनी, नवनाथनगराच्या मध्यभागी स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुुलाला लागूनच १० वर्षांपूर्वी तीनही वसाहतींच्या मध्यभागी मोकळ्या जागेत जलकुंभ उभारण्यासाठी जागा सिडकोने मनपाला हस्तांतर केली. जलकुंभ उभारण्याबाबत ना हरकत प्रमाणपत्रही दिले. त्यानुसार मागील १० वर्षांपूर्वी मनपाने जलकुंभाचे बांधकाम करण्यासाठी ५० लाखांची बजेटमध्ये तरतूद केली. या कामाच्या रीतसर बी-१ निविदा काढल्या. २००७ मध्ये ठेकेदाराला बांधकामाचा कार्यारंभ आदेशही देण्यात आला. हडकोवासीयांची तहान भागवण्यासाठी २० लाख लिटर पाणी क्षमता असलेला जलकुंभ येथे कार्यान्वित होणार होता.

अर्धवट काम सोडले
भाजपनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते ११ एप्रिल २००७ रोजी भूमिपूजन समारंभ पार पडला. तत्कालीन महापौर भागवत कराड, उपमहापौर लता दलाल, आयुक्त असीमकुमार गुप्ता यांनी बांधकामाची जबाबदारी तत्कालीन कार्यकारी अभियंता डी. पी. कुलकर्णी यांच्यावर सोपवली होती. ठेकेदाराने खड्डे खोदले, कॉलम उभे केले फुटिंग भरून ३२ बीम पक्के केले अन् पैसे मिळाल्याने हा सांगाडा उभारून काम अर्धवट सोडले.

५० लाखांचे काम कोटींवर
सन २००७ मध्ये या जलकुंभाच्या कामासाठी ५० लाखांचा निधी मंजूर झाला होता. पण थोडेच काम करून ठेकेदाराने पुढील काम सोडले. आज हा जलकुंभ पूर्ण उभारायचा असेल तर मात्र किमान पाच कोटी रुपये लागतील.

ही अतिशयगंभीर बाब आहे. इतक्या दिवसांपासून काम का रखडले हे पाहावे लागेल. या प्रकरणाची संपूर्ण संचिका मी मागवलेली आहे. या प्रकरणात नेमकी चूक कोणाची आहे हे आता सांगणे कठीण आहे. ते ही संचिका तपासल्यानंतरच ते स्पष्ट होईल. पण जाे कोणी दोषी असेल त्याला पाठीशी घातले जाणार नाही. ओमप्रकाशबकोिरया, आयुक्त

या वसाहतींचे होताहेत पाण्यावाचून हाल
हा जलकुंभ पूर्ण झाल्याने यादवनगर, नवनाथनगर, नवजीवन कॉलनी, मयूरनगर, द्वारकानगर, सुभाषचंद्र बोसनगर, गजानननगर, दीपनगर, स्वामी विवेकानंदनगर, वानखेडेनगर अन्य भागातील किमान दोन लाख लोकसंख्या असलेल्या या सर्व वसाहतींचे पाण्याअभावी हाल होत आहेत. सध्या त्यांना हर्सूल परिसरातील हरसिद्धी जलकुंभावरून कसेबसे पाणी दिले जात असले तरी ते खूपच अपुरे आहे.

आता केले स्ट्रक्चर ऑडिट
परिसरातील नागरिकांनी जलकुंभाचे काम पूर्ण करण्याबाबत वारंवार तक्रारी दिल्यानंतर तत्कालीन आयुक्त प्रकाश महाजन यांच्या आदेशाने मनपाच्या कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभागाने गेल्या वर्षी २०१५ मध्ये स्ट्रक्चर ऑडिटच्या नावाखाली माती परीक्षण केले. या जुनाट बांधकामाचा सांगाडा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील काही तज्ज्ञांच्या मार्फत तपासून जलकुंभासाठी ही जागाच योग्य नसल्याचा अहवाल सादर केला. त्यामुळे आता या सांगाड्याचा आधार घेत मनपा झोन कार्यालय बांधण्याचा घाट घातला जात आहे. मात्र, यापूर्वी बांधकाम कशाच्या आधारे केले हा प्रश्न उपस्थित होतो.

अधिकाऱ्यांचे एकमेकाकडे बोट
याबाबत डीबी स्टारने मनपात विचारणा केली असता तत्कालीन कार्यकारी अभियंता डी. पी. कुलकर्णी यांनी बोलण्यास नकार दिला. तर बांधकाम विभागाचे उपअभियंता एस. एम. जाधव यांनी पाणीपुरवठा कार्यकारी अभियंत्यांकडे बोट दाखवले. या विभागाचे उपअभियंता अशोक पदमे यांना विचारले असता त्यांनी वरिष्ठ पातळीवर काम झाल्याचे सांगत हात वर केले तर दुसरीकडे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांनी प्रकरण खूप जुने असल्याचे सांगितले. तर, तत्कालीन स्थापत्य अभियंता हेमंत फालक यांनी ठेकेदाराला वेळेत निधी दिल्याने काम बंद केल्याचे म्हणणे मांडले.

बातम्या आणखी आहेत...