आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिझेलसाठी 314 किमी फेरा; ऐन महागाईमध्ये रेल्वेची उधळपट्टी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- डिझेलच्या किमती वाढत चाललेल्या असल्या तरी रेल्वेला त्याचे मुळीच सोयरसुतक नाही. केवळ डिझेल भरण्यासाठी एक अख्खी रेल्वेगाडी दररोज 316 किमीचा प्रवास करत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. डिझेलसाठी जालना ते पूर्णा असा प्रवास करणारी ही गाडी चक्क रिकामी ये-जा करते. हे कमी होते म्हणून की काय, इंजिन तपासणी आणि स्वच्छतेसाठी एक दिवस ही गाडी मौलालीला (सिकंदराबाद) पाठवली जाते. या गाडीसाठी आठवड्याला दोन हजार 782 लिटर डिझेल विनाकारण खर्च केले जात आहे. 302 किमी अंतरासाठी सुरू करण्यात आलेल्या या गाडीच्या एकूण 618 किमी प्रवासाचा 51 लाख 26 हजार रुपयांचा वार्षिक खर्च खात्याला अकारण सोसावा लागत आहे. वर्षभरापासून रेल्वेचा हा तुघलकी कारभार चालला आहे.

इंधनाच्या बचतीचे धोरण केंद्र व राज्य सरकारने अवलंबलेले असले तरी रेल्वे मंत्रालयांतर्गत येणार्‍या दोन विभागांमधील समन्वयाच्या अभावामुळे राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होत आहे. चाकरमान्यांच्या सोयीसाठी जालना-नगरसोल शटल रेल्वेसेवा दररोज सकाळी व सायंकाळी मार्च 2012 पासून सुरू करण्यात आली. ही रेल्वे दररोज 302 कि.मी.चा दुहेरी प्रवास करते. या सेवेस डेमू-शटल (डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) संबोधले जाते व शटलची प्रवासी क्षमता 1,136 आहे. शटल आठ डब्यांची असून दोन्ही बाजूस इंजिन असते. प्रतिदिन एका बाजूच्या अंतरासाठी 200 लिटर डिझेल लागते. पुढचे इंजिन सुरू असते, तर मागचे इंजिनही चढ-उतारानुसार सुरू केले जाते. शटलसेवा रेल्वे व प्रवासी दोघांच्याही आवाक्यात आहे. रेल्वेला प्रति किलोमीटर एक लिटर डिझेल लागते. प्रवाशांना एक्स्प्रेसच्या तुलनेत शटलचे भाडेही कमी द्यावे लागते. डिझेल भरण्याची सोय मनमाड स्थानकात आहे आणि ही गाडी नगरसोलपर्यंत, म्हणजे मनमाडपासून 25 किमी अंतरावर थांबते.

डिझेलसाठी 314 किमी फेरा: परंतु केवळ नियोजनशून्य कारभारामुळे या गाडीला 316 किमीचा फेरा दररोज मारावा लागत आहे. स्वच्छतेचीही व्यवस्था मनमाडमध्ये आहे, पण त्यासाठी आठवड्यातून एकदा संपूर्ण रेल्वे मौलाली येथे पाठवली जाते.

जालना-नगरसोल डेमू शटल सेवा मनमाडपर्यंत नेण्यात यावी. मनमाड येथे डिझेल भरण्यासह स्वच्छतेची परवानगी देण्यात यावी. 1992 पर्यंत मीटरगेज असल्याने दक्षिण मध्य रेल्वे विभागासाठी दोन स्थानके होती. उपरोक्त विभागासाठी अतिरिक्त स्थानक निर्माण केले तर अनावश्यक होणारा डिझेलचा खर्च टाळता येईल.
- संतोषकुमार सोमाणी, अध्यक्ष मराठवाडा रेल्वे प्रवासी सेना.

मनमाड येथे शटलसह इतर गाड्यांसंबंधी प्रस्ताव दिला आहे. मनमाड येथे शटलला थांबण्यास परवानगी दिली जात नाही. डिझेल भरण्यासह इंजिन दुरुस्ती व स्वच्छतेची परवानगी दिल्यास डिझेलवर होणारा अनावश्यक खर्च टाळता येऊ शकतो. पर्यायी राष्ट्राच्या संपत्तीची अनावश्यक हानी टळेल.
-एम. प्रसाद, विभागीय मेकॅनिकल इंजिनिअर नांदेड.

लक्षवेधी
ये-जा करण्यासाठी 302 किमी प्रवास केल्यानंतर रेल्वेला डिझेल भरण्यासाठी दररोज पूर्णापर्यंत 158 किमी अंतर कापावे लागते. जाणे येणे 316 किमी अंतर होते. 700 हॉर्स पावरच्या इंजिनला प्रति किमी 1 लिटर डिझेल लागते, असे सूत्रांनी सांगितले.

शटल सेवा ठरतेय पांढरा हत्ती
..तर डिझेल 350 लिटरच लागेल
मध्य रेल्वेने जालना-नगरसोल शटलला मनमाड रेल्वे स्थानकावर डिझेल भरण्याची व स्वच्छतेची परवानगी दिल्यास आठवड्याला केवळ 350 लिटर इतकेच अतिरिक्त डिझेल खर्च होऊ शकते. नगरसोल ते मनमाड अंतर केवळ 25 कि. मी. इतकेच आहे. येण्या व जाण्याचे सात दिवसांतील अंतर 350 कि.मी. होत असल्याने एवढाच खर्च डिझेलवर लागेल.

शटलचा ताळेबंद असा
शटल आठवड्यातून सहा दिवस धावते.
जालना ते पूर्णा (येणे-जाणे) : 318 कि.मी.
जालना ते पूर्णा (येणे-जाणे) :1908 कि.मी. (आठवड्याचे अंतर)
गाडी आठवड्यातून एकदा स्वच्छतेसाठी सिकंदराबादला जाते
जालना ते सिकंदराबाद (येणे-जाणे) : 910 कि. मी.
आठवड्यात कापत असलेले एकूण अंतर (सिकंदराबादसह) : 2782 कि.मी.
आठवड्यात विनाकारण लागणारे डिझेल : 2782 लिटर.