आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना रोड दहा पदरी होणार, ओव्हरब्रिजसह ८५० कोटींचा आराखडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गेल्या वर्षभरापासून जमीन अधिग्रहणाअभावी रखडलेल्या जालना रोडच्या विस्तारीकरणाचा मार्ग लवकर मोकळा होणार असून तो ४५ मीटर रुंदीचा असून दहा पदरी असणार आहे. केंब्रिज शाळा ते नगर नाका असा १४.५ किमीचा रस्ता सिमेंटचा होणार असून तो मेंटनन्स फ्री होणार आहे. त्याचा अंतिम आराखडा तयार झाला असून येत्या जूनपासून काम सुरू होऊन २०१८ पर्यंत पूर्ण होईल, असा दावा केला जात आहे.

गेल्या वर्षभरापासून जालना रोडवरील विस्तारीकरणासाठी जमीन अधिग्रहण हा वादाचा मुद्दा ठरला होता. मनपाकडून अतिक्रमणे काढून तो रस्ता लवकर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला देणे अपेक्षित होते. मात्र रस्ता ४० मीटरचा होणार की, ४५ मीटरचा यावर मनपा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात एकमत होत नव्हते. आता मात्र या वादावर पडदा पडला असून हा १४.५ किमीचा रस्ता ४५ मीटर रुंदीचाच होणार असून त्यावर दहा लेन राहतील. मुख्य रस्ता सिमेंटचा सहा लेन आणि त्या बाजूला सर्व्हिस रोड आणि पाच फुटांचे दोन्ही बाजूने फुटपाथ राहील.

शहराच्या मध्यभागातून जाणारा हा रस्ता शहरासह बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षण राहील असाच तयार होणार आहे. त्यासाठी एकूण ८५० कोटी रुपयांचा निधी केंद्रीय भूपृष्ठ जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केला आहे. या रस्त्यावर नऊ फूट ओव्हरब्रिज राहतील ते पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी वापरता येतील. तसेच मुकुंदवाडी येथे भुयारी मार्ग होणार आहे.

विमानतळाजवळ आणखी एक जोड-उड्डाणपूल..
संग्रामनगरउड्डाणपूल होऊनही तो जेथे संपतो त्या पॉइंटवर प्रचंड वाहतूक खोळंबलेली असते. त्यावर उपाय म्हणून हा पूल जेथे संपतो तेथून काही अंतरावर आणखी एक उड्डाणपूल होईल. त्याद्वारे बीड बायपासकडे जाणे रस्ता सहजपणे ओलांडणे शक्य होईल. विमानतळासमोर, अमरप्रीत चौकात पूल प्रस्तावित आहेत. बीड रोडवरील झाल्टा फाटा ते पैठण रोडवरील महानुभाव आश्रम या रस्त्याचेही विस्तारीकरण याच योजनेत होईल. या सर्वच कामांचे बजेट ८५० कोटी इतके मंजूर झाल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली.