आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेमवारपासून जालना रोड मोकळा करा, तुमच्या टार्गेटसाठी आमच्यावर कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आतापर्यंत मी तुमची बेपर्वाई सहन केली. गरिबांच्या पोटावर पाय कशाला द्यावा, असाही विचार केला. पण तुमच्यामुळे सामान्य औरंगाबादकरांना त्रास होत असेल तर ते मी खपवून घेणारच नाही. आता बऱ्या बोलाने सोमवारपासून जालना रोड मोकळा करा, असे आदेश पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी शुक्रवारी (आठ जुलै) रिक्षाचालकांना दिले. उड्डाणपुलांच्या खाली, प्रत्येक चौकातील तुमचे बेकायदा थांबे बंद करा, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
गेल्या वर्षी आयुक्तांनी रिक्षाचालकांची बैठक घेऊन त्यांना शिस्तपालनासाठी १५ दिवसांची मुदत दिली होती. त्याचा फक्त महिनाभर परिणाम झाल्याचे दिसले. दुसरीकडे जालना रोडवर म्हणजे सिडको ते बाबा पेट्रोलपंप रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी सुमारे १०० कोटी रुपये खर्चून चार उड्डाणपूल उभारण्यात आले. मात्र, त्याचा फारसा फायदा झालेला दिसत नाही. सर्वच पुलांखाली रिक्षाचालकांनी बेकायदा थांबे तयार केले आहेत. ते कुठेही दाटीवाटीने उभे राहतात. प्रवाशांना खेचण्यासाठी त्यांच्यामध्ये स्पर्धा असते. परिणामी वाहतूक कोंडी वाढत चालली असल्याचे ‘दिव्य मराठी’ने पाच जुलै रोजीच्या वृत्तात निदर्शनास आणून दिले होते. याची दखल घेत शुक्रवारी वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. उड्डाणपुलाखाली उभ्या राहणाऱ्या, चौकात कोंडी करणाऱ्या आणि क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन जाणाऱ्या सुमारे १९२ रिक्षाचालक जप्त करून आयुक्तालयात आणून ठेवल्या. आता त्यांच्याकडून ५०० ते २२०० रुपयांपर्यंत दंडवसुली होणार आहे.

वाहतूक शाखेच्या विशेष पथकाने बेशिस्त चालकांच्या रिक्षा जप्त करत त्यांना पोलिस आयुक्तांसमोर उभे केले. तेव्हा त्यांनी अलंकार सभागृहात झालेल्या बैठकीत त्यांची कानउघाडणी केली. तेव्हा काही रिक्षाचालकांनी पाेलिसांची दंडेलशाही सुरू असल्याचा आरोप केला. आम्हाला आयुक्तांची बैठक आहे, असे सांगून येथे आणण्यात आले येथे दंड आकारणीच्या पावत्या देण्यात आल्याचे ते म्हणाले. मग आयुक्तांनी सहायक पोलिस आयुक्त चंपालाल शेवगण, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, अशोक मुदिराज, शिवाजी कांबळे यांच्याकडे विचारणा केली. त्यांच्या उत्तराने आयुक्तांचे समाधान झाले आणि मग त्यांनी रिक्षाचालकांना शिस्त पाळा; अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा दिला.

फसवून आणले नाही
^एकाही रिक्षाचालकाला फसवून आयुक्तालयात आणले नाही. रोजचे वाद होऊ नयेत म्हणून आयुक्तांनीच बैठकीची सूचना केली होती. सी.डी. शेवगण, सहायक पोलिस आयुक्त, वाहतुक शाखा.

बैठक सुरू असताना, एक रिक्षाचालक तावातावाने आयुक्तांना म्हणाला, साहेब, तुम्ही दिलेलेे दंड वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आमच्यावर विनाकारण कारवाई होत आहे. आयुक्तांची बैठक आहे, असा बहाणा करत आम्हाला येथे आणून पावत्या दिल्याचेही त्याने सांगितले. त्यावर आयुक्त म्हणाले की, बेशिस्तीने वागाल तर दंड होईलच. एकट्या पोलिसाला पाहून गुंडगिरी केली तर याद राखा. पोलिसांनीही रिक्षाचालकांशी गैरवर्तन करू नये. तो तुमच्याशी अरेरावी करू लागला तर वाद घालता त्याच्या रिक्षाचा फक्त नंबर नोंदवून त्याला सोडून द्या, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...