आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalpujan:Mula Water Entered In Jayakwadi Backwater

जलपूजन: मुळाचे पाणी जायकवाडीच्या बॅकवॉटरमध्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: गंगापूर | मुळा धरणाचे पाणी जायकवाडीच्या बॅकवॉटरपर्यंत दाखल झाल्यानंतर देवगड येथे शेतक-यांनी जलपूजन केले.
औरंगाबाद - मुळा धरणातून जायकवाडीकडे ९४७ दलघफू पाण्याचा ७ हजार क्युसेकने विसर्ग सुरू असून बुधवारी सकाळी १० वाजता ५२ तासांनंतर जायकवाडीच्या बॅकटवॉटरपर्यंत ते पोहोचले. ५ दिवस हा विसर्ग सुरू राहणार असल्याची माहिती मुळा पाटबंधारेचे शाखा अभियंता राजेंद्र कांबळे यांनी दिली.

नदी पात्रात ३० फुटाचे खड्डे
पाण्याच्या अपव्ययाचा अभ्यास करण्यासाठी औरंगाबादमधून १५ सदस्यांचा समावेश असलेली दोन पथके प्रवरा आणि भंडारदराकडे रवाना झाली आहेत. या पथकाला नदीपात्रात २५ ते ३० फुटाचे खड्डे आढळले आहेत. हे खड्डे भरण्यातही पाण्याचा अपव्यय होत आहे.

रब्बीला दुसरे आवर्तन
उर्ध्व गोदावरी खो-यातून सोडलेल्या पाण्यामुळे जायकवाडीत साधारण पाच टीएमसी पाणी पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या जायकवाडी २७ टक्के यामध्ये उपयुक्त पाणीसाठा ५८७ दलघमी इतका आहे. त्यामुळे रब्बीला दुसरे आवर्तन मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे चाळीस हजार हेक्टरमधील गहु, कापूस, ज्वारी, हरभरा या पिकांना फायदा होणार आहे. जायकवाडीचे पहिले आवर्तन ५ नोव्हेबर ते ३ डिसेंबरपर्यत चालले. दुसरे आवर्तन जानेवारीमध्ये मिळण्याची शक्यता आहे.

औरंगाबादला थेट फायदा नाही
जायकवाडीत आलेल्या पाण्याचा औरंगाबाद शहराला थेट फायदा होईल अशी स्थिती नाही. शहराची रोजची पाण्याची गरज १५० एमएलडीच्या आसपास असते. जायकवाडीच्या पंपहाऊसला असणा-या दोन पंपांची पाणी उपसण्याची क्षमता अनुक्रमे १०० व ५६ एमएलडीची आहे. आजघडीला दररोज १५० ते १५२ एमएलडी पाण्याचा उपसा केला जातो. या पाणयाचा तत्काळ फायदा नसला तरी आगामी काळात औरंगाबादच्या पाणीपुरवठ्यावर येणारा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

-निळवंडेचे पाणी आज सुटणार
भंडारदरातून येणा-या पाण्यामुळे निळवंडे गुरुवारी दुपारपर्यंत भरेल. त्यानंतर त्यातून जायकवाडीसाठी पाणी सोडले जाईल. शनिवारपर्यंत हे पाणी दाखल व्हायला सुरुवात होईल, असे कडाचे प्रभारी मुख्य अभियंता एन.व्ही. शिंदे म्हणाले.निळवंडे ते जायकवाडी अंतर १९० कि.मी. आहे.

स्थगितीस नकार
भंडारदरा,मुळा व निळवंडेतून पाणी सोडण्याला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.प्रवरा सोसायटी व हरिश्चंद्र फेडरेशनने स्थगितीची मागणी केली होती. तिला गेवराईच्या शारदा प्रतिष्ठानने विरोध केला.