आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेती शाळांतून शेतकऱ्यांना जलयुक्त शिवाराचे धडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गावात जलयुक्त शिवार अभियान यशस्वी करण्यासाठी शेतीशाळा महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या माध्यमातून शेतीशाळेत पाणी व्यवस्थापन पीक पद्धतीबाबत माहिती देण्यात येत आहे. पाच वर्षांपूर्वी राज्यात राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाच्या माध्यमातून ही संकल्पना सुरू होती. मात्र, त्यानंतर शेतीशाळेचे प्रमाण कमी झाले असले तरी वैजापूर तालुक्यात ३१ गावांत शेतीशाळा सुरू आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात घट होऊन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत असल्याची माहिती कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी उदय देवळाणकर यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना दिली.

जलयुक्त शिवारमध्ये नाला खोलीकरण रुंदीकरण, कंपार्टमेंट बंडिंग, सिमेंट नाला बांध यासह अनेक उपक्रमांच्या माध्यमातून पाणीसाठे निर्माण केले जात आहेत. उपलब्ध पाण्याच्या योग्य वापरासाठी गावांत शेतीशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. राज्यात इतर तालुक्यांत शेतीशाळेचे प्रयोग कमी झाले असताना वैजापूर तालुक्यातील ३१ गावांत शेतीशाळेचा प्रयोग यशस्वीपणे सुरू आहे.

शेती शाळेत ठरते पाण्याचे बजेट : कापसाला वर्षाकाठी हेक्टरी ७० लाख लिटर पाणी लागते. तुरीसाठी ३५ लाख, ज्वारी २५, ऊस २.५ कोटी लिटर आणि मका ७० लाख लिटर पाणी लागते. गावाचे वर्षाकाठीचे पर्जन्यमान, त्यामधून साठणारे पाणी आणि आपण घेणारी पिके यातील तफावत शेतीशाळेत सांगितली जाते. त्यामुळे गावाचे पाणी व्यवस्थापन करण्याचे धडे येथे दिले जातात. गावाच्या भिंतीवरच वॉटर बजेट लिहिण्याच्या सूचना दिल्या जातात. त्यामुळे पाण्याची बचत होण्यास मदत होते.

असा होतो फायदा : शेती शाळेत पाण्याचे योग्य व्यवस्थापन शिकवल्यामुळे त्यानुसार पिके घेतली जातात. तसेच पिकांना लागणारे पाणी, पारंपरिक खते, रासायनिक खतांचा प्रमाणात वापर आणि तंत्रज्ञानाच्या वापरामुळे उत्पादन खर्चात बचत होऊन शेतकऱ्यांच्या नफ्यात वाढ होते. शेतीशाळेमुळे कृषी खात्याच्या योजनांची माहितीही शेतकऱ्यांना मिळते.

वैज्ञानिक कारणांचाही उलगडा : कृषी उपविभागीय अधिकारी उदय देवळाणकर यांनी सांगितले की, पूर्वी शेतीच्या धुऱ्यावर शेराची झाडे (झिरोफाइड्स) लावली जायची. त्यामागे वैज्ञानिक कारण आहे. या झाडांमुळे शेतात येणारे उष्ण वारे थंड करण्याचे आणि त्याची गती कमी करण्याचे काम होते. तसेच रस शोषण करणाऱ्या किडीचे नियंत्रण होत असे. त्यामुळे दुष्काळावर आपोआप मात केली जात असे. ही माहिती सांगितल्यानंतर वयोवृद्ध शेतकऱ्यांनी आमच्या वडिलांनी ही वनस्पती लावण्याचे आवर्जून सांगितले होते, अशा आठवणी सांगितल्या.
वैजापूर तालुक्यातील माळीसागज येथे भरलेल्या शेतीशाळेत शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेणारे शेतकरी.

काय आहे शेती शाळा ?
शेतकऱ्यांनाशेतीच्या तंत्रज्ञानाची माहिती नसते. त्यातच नव्या पिढीला जुन्या पद्धती, त्यामागील विज्ञानाची माहिती नसते. कृषी सहायक आठवड्यातून एक दिवस शेतकऱ्यांना दोन तास मार्गदर्शन करतात. त्यांना शेतीविषयक नवीन तंत्रज्ञानाची माहिती दिली जाते. माळीसागजला मीना पंडित प्रशिक्षण देत आहेत.

तंत्रज्ञानाचे धडे
शेती शाळेतून आम्ही शेतकऱ्यांना जुने तंत्रज्ञान आणि नवे तंत्रज्ञान या दोघांचीही माहिती देत आहोत. तसेच शासकीय योजनांची माहिती सांगितली जाते. शेतकरी आणि अधिकारी यांच्यात चांगला संवाद निर्माण झाल्यामुळे त्यांच्या अडचणींची माहिती मिळते. मीना पंडित, कृषी सहायक

पाणी बचतीचा मार्ग
शेतीशाळेमुळे शास्त्रोक्त शेती करण्याचे मार्गदर्शन मिळत आहे. यामध्ये पिकांना लागणारे पाणी आणि आपल्याकडे असलेले पाणी याचा मेळ घालणे सोपे ठरणार आहे. गावातल्या शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम फायद्याचा ठरत आहे. त्यामुळे पाणी बचतीचे मार्गही कळत आहेत. -पंकज गाडेकर, सरपंच

नव्या पिढीसाठीच
जुन्या काळीशेती कशी करायचे याची नव्या पिढीला माहिती नाही. आमचे वडील शेतीच्या धुऱ्यावर शेर लावायचे. त्यामागचे विज्ञान नव्या पिढीला माहीत नाही. त्यामुळे पाणी बचत करणाऱ्या वनस्पती दिसत नाहीत. या प्रशिक्षणातून नवीन तंत्रज्ञान कळत आहे. - सुखदेव गाडेकर, शेतकरी
बातम्या आणखी आहेत...