आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jamia Millia Islamia (JMI) Former Vice Chancellor Mushirul Hasan In Aurangabad

राजकीय पक्षांकडून मुस्लिमांची उपेक्षा; मुशीरूल हसन यांची टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भारतातील कोणत्याच राजकीय पक्षाला मुस्लिम समाजाच्या विकासाचे सोयरसुतक नाही. मुळात समाजाच्या विकासासाठी सर्वच पक्षांमध्ये ‘पॉलिटिकल कमिटमेंट’चा फार मोठा अभाव आहे. मुस्लिम म्हणून विशेष ओळख न ठेवता भारतीय म्हणून सर्व प्रकारच्या समाजात मिळून-मिसळून राहण्याने, प्रत्येक क्षेत्रात स्वत:हून पुढाकार घेण्याने आणि सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक अभिसरणातूनच मुस्लिम समाजाच्या उत्थानाचा मार्ग जातो, असे विचार नवी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचे माजी कुलगुरू, अभ्यासक पद्मश्री प्रा. मुशीरूल हसन यांनी व्यक्त केले.

सेंटर ऑफ प्रमोशन ऑफ डेमॉक्रसी अँड सेक्युलॅरिझम (सीपीडीएस) तसेच विद्यापीठाचा राज्यशास्त्र विभाग व मौलाना आझाद अध्यासनाच्या वतीने शुक्रवारपासून मुस्लिम प्रश्नांविषयीच्या राष्ट्रीय परिषदेला सुरुवात झाली. विद्यापीठातील महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात आयोजित परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, 1983 मध्ये गोपाल सिंह, तर 2010 मध्ये सच्चर समितीच्या अहवालानुसार तेव्हा आणि आताही मुस्लिम समाजामध्ये कुठलाच बदल झालेला नाही. हा सर्वाधिक मागास समाज असल्याचा दोन्ही समित्यांचा अहवाल आहे. समाजामध्ये ‘आयडेंटिटी प्रॉब्लेम’, बदल न स्वीकारणे, शैक्षणिक व इतर प्रश्न असले, तरी मुळात देशातील कुठल्याच राजकीय पक्षाने समाजाच्या विकासाची जबाबदारी उचलली नाही. पश्चिम बंगालमध्ये 32 वर्षे कम्युनिस्टांची सत्ता होती. मात्र, तिथेही मुस्लिम मागासच आहेत. लालूप्रसाद यादव किंवा मुलायसिंग यादव हे मुस्लिमांचे नेते म्हणवतात. मात्र, त्यांच्या राज्यातही मुस्लिमांची स्थिती काही वेगळी नाही. भारतात समाजाच्या विकासाची जोरदार घोषणा होते; पण केवळ मतदानासाठी वापर होतो. या स्थितीत सत्ताधार्‍यांवर, पक्षांवर विसंबून काहीही होणार नाही. त्यासाठी अनेक पातळ्यांवर बदल होणे गरजेचे आहे.

न्यायमूर्ती बाबू र्मलापल्ले यांनी शिक्षणाच्या अभावामुळेच समाज मागास असल्याचे नमूद केले. कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनीही मनोगत व्यक्त केले, तर डॉ. हमीद खान यांनी मौलाना आझाद अध्यासनाची भूमिका मांडली. राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. बी. एस. वाघमारे यांनी स्वागत केले. ‘सीपीडीएस’चे अध्यक्ष डॉ. झहीर खान यांनी प्रास्ताविक केले. डॉ. दुलारी कुरेशी यांनी सूत्रसंचालन केले.