आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीकृष्णाला बाराशे दिव्यांची आरास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - राजाबाजार - दिवाण देवडी माहेश्वरी प्रभागाच्या वतीने अग्रसेन भवनात ‘रामदेवबाबा’(भगवान श्रीकृष्ण)चा अनोखा उत्सव ‘जम्मा जागरण’जल्लोषाच्या वातावरणात गुरुवारी (19 सप्टेंबर) सायंकाळी 6 वाजता साजरा करण्यात आला. ‘खम्मा खम्मा हो रामा, रुणी चेरा धनिया, थाने ध्याचे, आखो मारवाड हो अखो गुजरात हो, अजमालजी कवर’ या भक्तिगीतांबरोबर भगवान श्रीकृष्णाला 1200 दिव्यांची आरास मांडण्यात आली.

रामदेवबाबांच्या आरतीने कार्यक्रमाला सुरुवात झाली. भजन, नृत्य आणि नाट्यमयरीत्या श्रीकृष्णाच्या लीला आणि जीवनकथा या कार्यक्रमातून सादर करण्यात आली. उपस्थित महिलांनी नृत्यात सहभागी होऊन जल्लोष केला. याप्रसंगी परतूर येथील राजेश-रोशन नवशक्ती भजनी मंडळाच्या वतीने भजन सादर करण्यात आले. यामध्ये राजेश मंत्री आणि रोशन बगडिया यांनी चमूसह भजनांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे आयोजन सीमा लखोटिया, पुरुषोत्तम चिचाणी, अंजू बलदवा, सुनील मालाणी, जितेंद्र झवंर, योगिता झंवर यांनी केले होते. कार्यक्रमासाठी राजाबाजार- दिवाण देवडी प्रभागाचे अध्यक्ष सतीश लढ्ढा, उपाध्यक्षा विजया तापडिया, सचिव योगेश मालाणी यांचे मार्गदर्शन लाभले. रूपाली मालाणी यांनी सूत्रसंचालन, तर दुर्गा चेचाणी यांनी आभार मानले.

काय आहे जम्मा जागरण? : रामदेवबाबा हे राजस्थानी कुलदैवत आहे. राजस्थानातील रुणीचा गावी भाद्रपद पौर्णिमेला यानिमित्ताने मोठा उत्सव साजरा केला जातो. रामदेवबाबा म्हणजे श्रीकृष्णाचा अवतार. याविषयीच्या आख्यायिकेमध्ये म्हटले की, पूर्वीच्या काळी होऊन गेलेला राजा अजमल हा न्यायप्रिय, शूर आणि प्रजेवर प्रेम करणारा राजस्थानात होऊन गेला. राजाला संतती नसल्याने प्रजा त्याला अशुभ मानत होती. यामुळे राजा भगवतांकडे संतती प्राप्तीची याचना करतो. भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाल्यावर राजा त्यांना पुत्र म्हणून माझ्या पोटी जन्माला या, असे सांगतो. तेव्हा रामदेवबाबाच्या रूपात श्रीकृष्ण राजाच्या पोटी जन्माला येतो. अशा या रामदेवबाबांचा जन्मोत्सव आणि विवाह सोहळा भजन आणि नृत्य, नाट्यातून सादर करून भगवंताची स्तुती केली जाते.

नृत्यनाट्यातून श्रीकृष्ण जीवनचरित्र
राजेश-रोशन हे दोघे गेल्या 10 वर्षांपासून शहरात ‘जम्मा जागरण’ उत्सवासाठी सादरीकरण करतात. श्रीकृष्णाच्या जीवनचरित्राचे अनेक प्रसंग नृत्य, नाट्यातून मांडतात. नव्या पिढीला संत, त्यांचा महिमा माहिती करून देण्याचा प्रयत्न केला जातो. - सीमा लखोटिया

लक्षणीय ठरला दीपोत्सव
रामदेवबाबांचा विवाह सोहळा हा कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग होता. ‘ज्योत से ज्योत जगाते चलो’ या उक्तीप्रमाणे मुख्य ज्योतीपासून सभागृहात उपस्थित प्रत्येकाने आपल्या हातातील ज्योत प्रज्वलित केली. या वेळी सुमारे 1200 दिवे सभागृहात लखलखत होते.