आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जानेफळच्या ग्रामसेवकाचा मनमानी कारभार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खंडाळा - जानेफळ येथील ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालयात येत नाही. फोन केल्यास व्यवस्थित बोलत नाही. ग्रामसेवक घेतलेले निर्णय सरपंच व ग्रामस्थांनादेखील सांगत नाही, असा आरोप जानेफळ ग्रामपंचायत व ग्रामस्थ करत आहेत.
खंडाळ्यापासून 5 कि. मी. अंतरावर सुमारे साडेचार हजार लोकसंख्येचे जानेफळ गाव आहे. येथे 25 दिवसांपूर्वी एस. एस. सुलाने यांनी ग्रामसेवक पदाचा पदभार स्वीकारला. ज्या दिवशी पदभार स्वीकारला त्याच दिवशी ग्रामसेवकाने तलाठी कार्यालय खाली केले. हे काम करताना त्यांनी सरपंच व सदस्य, ग्रामस्थांना न विचारता ग्रामपंचायतीमधील तलाठ्याचे दप्तर हलविले. आता पदभार स्वीकारून 25 दिवस उलटले तरी ग्रामसेवक ग्रामपंचायतीमध्ये परतला नाही. ग्रामस्थ जेव्हा ग्रामपंचायत कार्यालयात येतात, तेव्हा त्यांना कळते की, ग्रामसेवक येथे नाही. ग्रामसेवकाला फोन लावून ग्रामपंचायत कार्यालयात केव्हा येणार, असे विचारे असता ते पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेला जायचे आहे किंवा मिटिंग आहे, असे कारण सांगून वेळ मारून नेतात.
परिस्थिती जैसे थेच - जानेफळ येथे कटारे हे ग्रामसेवक होते. मात्र, 3 महिन्यापुर्वी त्यांची बदली झाली. त्यानंतर घोडेकर हे प्रभारी ग्रामसेवक आले. मात्र, कोणतेच कामे होत नसल्याने ग्रामस्थांनी कायमस्वरूपी ग्रामसेवकाची मागणी पंचायत समितीकडे केली. त्यानंतर 25 दिवस अगोदर एस. एस. सुलाने यांची नियुक्ती करण्यात आली; मात्र परिस्थिती जैसे थेच आहे.
रखडलेली कामे सुरू करावीत - नवीन ग्रामसेवक पदभार स्वीकारल्यानंतर अजून ग्रामपंचायत कार्यालयात आलेले नाही. तीन महिन्यांपासून ग्रामस्थांची कामे खोळंबून पडली आहेत. ग्रामसेवकाने ग्रामपंचायत कार्यालयात येऊन ग्रामस्थांची रखडलेली कामे मार्गी लावावीत. - रखमाबाई श्रीरंसागर, सरपंच, जानेफळ