आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Japan Same To Patriotism, Discipline Learned Is Smart City

गप्पा मनमाेकळ्या : जपानसारखी देशभक्ती, शिस्त शिकलो तरच होईल स्मार्ट सिटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विचार मांडताना डावीकडून उद्योजक सुनील किर्दक, विवेक देशपांडे आणि उमेश दाशरथी. छाया : माजिद खान - Divya Marathi
विचार मांडताना डावीकडून उद्योजक सुनील किर्दक, विवेक देशपांडे आणि उमेश दाशरथी. छाया : माजिद खान
औरंगाबाद- शहराचाचेहरामोहरा काही वर्षांत निश्चित बदलणार आहे. पायाभूत सुविधांसह जगभरातील उद्योग शहरात येणार आहेत. यातून आर्थिक सुबत्ता निश्चितच येईल, याबरोबर सामाजिक आव्हाने आपल्या समोर उभी राहतील. ही आव्हाने पेलण्यासाठी आतापासून तयारी करावी लागेल. जगातील प्रगत राष्ट्र जपानकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. शिस्त आणि राष्ट्रनिष्ठा प्रत्येकांनी अंगीकारली तरच औरंगाबाद शहर खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटी होईल. आली प्रगती वेगाने हाेऊ शकेल, असे मत प्रसिद्ध उद्योजक उमेश दाशरथी यांनी व्यक्त केले. या मताशी सहमती दर्शवत विवेक देशपांडे, सुनील किर्दक यांनीही स्मार्ट सिटीसंबंधीची मत मांडले. "दिव्य मराठी'च्या संपादकीय सहकाऱ्यांशी गप्पा मारताना शहरातील औद्योगिक क्रांतीच्या नांदीवर त्यांनी अनेक नवीन पैलू उलगडले.
मत आणि अपेक्षा...
जपान कितीही प्रगत असला तरी त्यांना भारत देश जवळचा वाटतो. कारण भारतीय संस्कृती त्यांना भावते ती बुद्धगया, अजिंठा-वेरूळ यांसारख्या पर्यटनामुळे. जपानचे चीन, कोरियाशी जमत नाही. अमेरिकन संस्कृतीशी जपानचे जास्त जुळत नाही. त्याचा फायदा भारताला होत आहे. त्याचा लाभ आपण घेतला पाहिजे, असे उमेश दाशरथींसह विवेक देशपांडे आणि सुनील किर्दक म्हणाले.

विदेशी कंपन्यांनाही आपली गरज-सुनील किर्दक
भारतात जपानसारखी शिस्त नाही, आपण लोक त्यांच्यातके स्मार्टही नाहीत; पण भविष्यात तसे होण्याचा प्रयत्न केला तर आपण जगाच्या खूप पुढे जाऊ शकतो. आपल्याकडे बाजारपेठ मोठी आहे. कुशल अन्् मुबलक मनुष्यबळ आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जागा भरपूर आहे. या तिन्ही गोष्टी औरंगाबादेत असल्याने विदेशी कंपन्या येत आहेत. सुपा येथे जपान सरकारकडून होणाऱ्या इंडस्ट्रीयल झोनचा औरंगाबादलाही फायदा होईलच. भारतात तरुणांची संख्या जास्त आहे. जपानमध्ये नागरिकांचे सरासरी वयोमान ६५ आहे. त्या तुलनेत आपला देश म्हणून संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे लागले आहे. जपानमध्ये उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची संख्या जास्त आहे. बाजारपेठ मोठी असल्याने विदेशी कंपन्यांना आपली गरज वाटत आहे. म्हणूनच त्या कंपन्या औरंगाबादसह भारतात येण्यास उत्सुक आहेत. जपानमध्ये भारताइतके काहीच सोपे नाही. आपल्याकडे निसर्गापासून ते मनुष्यबळापर्यंत सर्व अनुकूल आहे. मात्र, पायाभूत सुविधा कितीही दिल्या तरी प्रवृत्ती जोवर बदलत नाही, तोवर आपण स्मार्ट होणार नाही.

कारखाने जगल्याने स्मार्ट सिटी होत नाही- विवेक देशपांडे
शहरात खरेच विकासाची गंगा येऊ घातली आहे. येथे जपानसह अमेरिका अन्् युरोपीय देशांसह जगभरातील उद्योग येतील, यात शंका नाही, हे बदल होताना आपल्या समाजातही मोठे बदल अपेक्षित आहेत. आम्ही केलेल्या जपानच्या दौऱ्यात त्यांची काही वैशिष्ट्ये जाणवली. तेथील प्रत्येक नागरिक सुसंस्कृत, शिस्तबद्ध अाणि देशप्रेमाने भारलेला आहे. तेथे आमच्या टॅक्सी चालकाचा रस्ता चुकला तेव्हा त्याने मीटर बंद केले. आणि आमची क्षमा मागितली, एक टॅक्सी ड्रायव्हर आम्हाला त्यांच्या देशाची संस्कृती शिकवून गेला. आपल्या शहराबरोबर देशात असे जेव्हा होईल तेव्हाच आपण स्मार्ट होऊ. कारण स्मार्ट सिटी ही फक्त मोठे कारखाने अाणि बिल्डिंग उभारून होणार नाही, वेळा पाळणे, कोणालाही फसवणे हे गुणदेखील स्मार्ट सिटीशी संबंधित आहेत, हेही लक्षात घेतले पाहिजे. स्मार्ट सिटीचे मानांकन ठरलेले आहे. तेथील रस्ते, इमारती, सर्व सुविधा काही क्षणात मिळाल्या पाहिजेत. वीज,पाणी मुबलक पाहिजे. पण ते वापरणारे स्मार्ट नसतील तर त्या शहराला स्मार्ट म्हणता येणार नाही.

औरंगाबाद शहराला फायदा होणारच; उमेश दाशरथी
येत्या काही वर्षांत स्मार्ट सिटीमुळे शहराची सर्व बाजूंनी प्रगती झालेली दिसेल, त्याची सुरुवात गेल्या दोन वर्षांपासून झाली आहे. स्मार्ट सिटीच्या संकल्पनेमुळे जमिनीचे अधिग्रहण झाले. अनेकांकडे सहजतेने लाखो रुपये आले, पण हा पैसा योग्य ठिकाणी खर्च करायला हवा, सहजतेने येणारा पैसा पचवणे अवघड असते, पण मेहनत करून कमावलेला पैसा हा वाईट मार्गाकडे जातच नाही. मुख्यमंत्र्यांसाेबत जपान दौऱ्यावर गेलो तेव्हा तेथील अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, हे जाणवले. जपानकडे जगातील दुसरा प्रगत देश म्हणून बघतो, तेव्हा त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप काही आहे. तेथील प्रत्येक माणसात असलेली राष्ट्रनिष्ठा, स्वयंशिस्त वाखाणण्यासारखी आहे. तीच शिस्त अन्् राष्ट्रनिष्ठा आपण शिकलो तर आपली प्रगती प्रचंड वेगाने होईल, यात शंका नाही. केंद्र आणि राज्य सरकार परदेशी गुंतवणुकीविषयी अतिशय सकारात्मक पावले उचलत आहे. त्याचा निश्चितच महाराष्ट्र आणि औरंगाबादलाही फायदा होणार, याविषयी कोणतीही शंका नाही.