आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेतील जॅपनीज गार्डनच्या विरोधात पर्यावरणप्रेमी एकवटले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सलीम अली सरोवराच्या परिसरात जॅपनीज गार्डन करण्याच्या विरोधात शहरातील पक्षिमित्र व पर्यावरणप्रेमी एकवटले असून त्यांनी हा प्रकल्प सुरू करू नये, अशी भूमिका घेतली आहे. ‘जॅपनीज गार्डन’च्या नावाखाली सलीम अली सरोवराचा पिकनिक स्पॉट न करता पक्ष्यांसाठी त्यांचे आर्शयस्थान आहे तसेच सुरक्षित ठेवा अशी भूमिका पक्षिमित्र आणि पर्यावरणवाद्यांनी घेतली आहे. प्रसंगी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे.

राज्य सरकार आणि मनपाच्या वतीने सलीम अली सरोवराच्या परिसरात जॅपनीज गार्डन आणि रोज गार्डन विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी निधीचीही तरतूद करण्यात आली. नव्या रूपातील सरोवरामुळे पक्ष्यांचे आर्शयस्थान धोक्यात येईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळेच गुरुवारी शहरातील पक्षिमित्र, पर्यावरणवाद्यांची एक बैठक मुकुल मंदिर शाळेत झाली. सरोवराच्या सुशोभीकरणामुळे होणार्‍या परिणामांबाबत चर्चा करण्यात आली. ज्येष्ठ पक्षिमित्र निर्मलदादा, अरविंद पुजारी, मिलिंद गिरधारी, किशोर गठडी, डॉ. किशोर पाठक, बैजू पाटील, डॉ. विवेक घारपुरे, राजेंद्र ढोंगळे, प्रशांत तुळासकर, अमर परदेशी यांच्यासह अनेक पर्यावरणप्रेमी उपस्थित होते. ढोंगळे आणि डॉ. घारपुरे यांनी पर्यावरण वाचवण्यासाठी प्रसंगी न्यायालयात जाण्याची भूमिका मांडली.

पक्षिमित्र डॉ. किशोर पाठक म्हणाले की, या तलावात लोकांना यायला बंदी असल्याने तेथे आजपर्यंत पक्ष्यांना सुरक्षितता मिळत आली आहे. पण लोकांचा वावर सुरू झाला तर पक्षी येणेच थांबणार आहे. मनपा सलीम अली सरोवराचा पिकनिक स्पॉट करत आहे हे सर्वथा चुकीचे आहे. मनपाला बागा सुशोभित करायच्याच असतील तर स्वामी विवेकानंद उद्यान, मजनू हिल उद्यान यासारखी अनेक उद्याने आहेत. शहरात असलेले पक्ष्यांच्या एकमेव आर्शयस्थानाचा बळी दिला जाऊ नये, अशी आमची भूमिका आहे.

या वेळी जॅपनीज गार्डन प्रकल्पाला कडाडून विरोध करण्यात आला. याबाबत मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांना भेटून निवेदन देण्यात येणार आहे. प्रकल्पाचे काम सुरू करू नये, असे आवाहन करण्यात येणार आहे.

बैठकीत व्यक्त झालेली भीती
> शहरातील एकमेव पाणथळ तलाव असलेले सरोवर हे पक्ष्यांचे आर्शयस्थान आहे.
> पाणथळ, जलपर्णी, बाभूळबन या पक्ष्यांच्या अधिवासासाठी सोयीस्कर आहेत.
> सरोवरात देश- विदेशातील 62 जातींचे पक्षी आर्शयाला येत असतात.
> जॅपनीज गार्डनच्या नावाखाली बाभूळबन, जलपर्णी तोडण्यात येणार आहेत. असे केल्यास पक्ष्यांचा आसरा नाहीसा होईल.
> सरोवरात बोटिंग सुरू केले जाणार असल्याने मोठा धोका उत्पन्न होईल.

काय आहे जॅपनीज गार्डन प्रकल्प ?
>सलीम अली सरोवराच्या बाजूला आठ एकरमध्ये जॅपनीज गार्डन, रोज गार्डन उभारणार.
> सरोवरात बोटिंगची सोय असणार. त्यासाठी तिकीट आकारण्यात येणार आहे.
> सरोवराच्या उत्तर बाजूस जॅपनीज गार्डन विकसित करण्यासाठी 1 कोटीचा निधी जिल्हा वार्षिक योजनेतून देण्यात येणार. उर्वरित खर्च मनपा करणार आहे.