आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवखेडे हत्याकांड प्रकरणी कृती समितीचा क्रांती चौकात सत्याग्रह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ‘जवखेडे हत्याकांडातील आरोपींना मोकाट सोडणारे पोलिस प्रशासन मुर्दाबाद..’ अशा घोषणांनी गुरुवारी (१३ नोव्हेंबर) क्रांती चौक परिसर दणाणला. दलित अत्याचारविरोधी संघर्ष समितीच्या नियोजित मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर दुपारी दोन तास जोरदार घोषणाबाजी केली.

जवखेडे हत्याकांडाची चौकशी सीआयडीकडे सोपवून सर्व आरोपींना त्वरित अटक करावी, आरोपींचे कबुलीजबाब न्यायाधीशांसमोर नोंदवावेत, दलित हत्याकांडांची कारणमीमांसा करणारी राज्यस्तरीय अभ्यास समिती नेमून यापुढे कठोर उपाययोजना करण्यात यावी आदी मागण्यांसह समितीने गुरुवारी मोर्चाऐवजी सत्याग्रहाचे आयोजन केले. समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक अॅड. रमेश खंडागळे, भीमराव बनसोड, प्रा. प्रकाश शिरसाट, राधाकिशन पंडित, बुद्धप्रिय कबीर यांच्या नेतृत्वात हा सत्याग्रह करण्यात आला. आंदोलनाचा समारोप अॅड. खंडागळे यांच्या भाषणाने झाला. ते म्हणाले, ‘दलितांवरील अत्याचाराच्या मागे सवर्ण मानसिकता असून जातीय विषमतेमुळे क्षुल्लक कारणातून दलितांची कुटुंबे संपवण्यात येत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील सोनई, सोनेवाडी, खर्डा आणि आता जवखेडे या प्रत्येक हत्याकांडामागे प्रस्थापित राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना सरकार आणि पोलिस प्रशासनाचे अभय असून त्यामुळेच क्रूर हल्ले होत आहेत. आता हे हल्ले थांबले नाहीत तर जशास तसे उत्तर देण्यात येईल,’ असा इशारा अॅड. खंडागळे यांनी दिला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते के. ई. हरदास, भीमराव बनसोड, सुभाष लोमटे, प्रा. डॉ. उमाकांत राठोड, दैवशाला गवांदे, अॅड. अभय टाकसाळ आदींची भाषणे झाली. सत्याग्रह लवकर संपवण्याची सूचना करणारे क्रांती चौकचे सहायक पोलिस निरीक्षक अशोक आव्हाड आणि बुद्धप्रिय कबीर यांच्यात शाब्दिक चकमक झाली. अण्णासाहेब खंदारे, माजी नगरसेवक गौतम लांडगे, माजी नगरसेविका चंद्रभागाबाई दाणे, शकुंतला धांडे, किशोर म्हस्के, शेख मिखाईल, अरुण शिरसाट, सुनील राठोड आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी केलेली जेल भरोची मागणी पोलिसांनी फेटाळली. मधुकर खिल्लारे यांनी सूत्रसंचालन केले. भगवान भोजने यांनी सहभागी सत्याग्रहींचे
आभार मानले.