आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 ऑगस्टपर्यंतच पुरेल जायकवाडी धरणातील पाणीसाठा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मराठवाड्यात जुलैअखेर वार्षिक सरासरीच्या केवळ 15 टक्के पाऊस झाला. त्यामुळे विभागातील धरणांच्या पाणीपातळीवर परिणाम झालेला आहे. जायकवाडीत अवघा दीड टक्के पाणीसाठा उरला असून तो 15 आॅगस्टपर्यंत पुरेल. त्यानंतर मात्र मृतसाठ्यातून पाणी वापरावे लागेल. जायकवाडी धरणात सध्या एकूण 770 दलघमी इतका पाणीसाठा आहे. त्यातील उपयुक्त पाणीसाठा 32.88 दलघमी असून तो 15 ऑगस्टपर्यंत पुरेल इतका असल्याची माहिती कडा विभागाचे सहायक अभियंता ए. एन. हिरे यांनी दिली. निम्न दुधना धरणात 30 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. येलदरी धरणात 39 टक्के पाणीसाठा शिल्लक असून उपयुक्त पाणीसाठा 318 दलघमी इतका आहे. तर सिद्धेश्वर, मांजरा, माजलगाव आणि निम्न तेरणा धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे.

तर मृतसाठ्यावर मदार : जायकवाडीच्या वरील धरणांतून पाण्याची आवक झालेली नाही. तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्याने धरणात पाण्याची आवक नाही. 15 ऑगस्टनंतर जिवंत साठा संपल्यावर मृतसाठ्यावर सर्व मदार राहणार आहे. सध्या मृतसाठ्यातून साडेनऊ टीएमसी पाणी वापरता येऊ शकते. हे पाणी साधारण सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ पुरेल इतके असल्याची माहिती कडा विभागाच्या वतीने देण्यात आली. गेल्या वर्षीदेखील मृतसाठ्यातून 145 दलघमी (सात टीएमसी) पाण्याचा वापर करण्यात आला होता.
दोन दिवसांत मान्सून सक्रिय
सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत मराठवाडा आणि विदर्भात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. सध्या दुपारच्या वेळी तापमान वाढत आहे व हलकासा पाऊस पडत आहे. - श्रीनिवास औंधकर, संचालक, एमजीएम खगोलशास्त्र विभाग, नांदेड.