औरंगाबाद- जायकवाडीत पाणी सोडण्यासाठी नगर जिल्ह्यातील साखरसम्राटांचा विरोध आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या हक्काचे पाणी सोडले नाही तर नगर जिल्ह्यातून शहरात येणारे दूध बंद करू, असा इशारा जायकवाडी संघर्ष समितीचे अध्यक्ष जयाजी सूर्यवंशी यांनी निदर्शनादरम्यान दिला आहे. गुरुवारी क्रांती चौकामध्ये शेतकऱ्यांनी नगरमधील पुढाऱ्यांच्या विरोधात निदर्शने केली.
जायकवाडीत पाणी सोडण्यासाठी नगरच्या साखरसम्राटांचा विरोध आहे. पाणी सोडले जाऊ नये यासाठी त्यांनी सर्व शक्ती पणाला लावली. मात्र मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी सूर्यवंशी यांनी केली. मराठवाड्याच्या हक्कानुसार जायकवाडीत किमान २२ टीएमसी पाणी सोडण्याची गरज आहे. मात्र नगरमधील पुढाऱ्यांनी त्याला विरोध सुरू केला आहे. त्यामुळे या निदर्शनांमध्ये शेतकऱ्यांनी शंकराराव कोल्हे, राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. जायकवाडीत पाणी सोडले नाही तर नगरहून येणारे दूध बंद करण्याचे आंदोलन छेडले जाईल, असे सूर्यवंशी यांनी सांगितले. या आंदोलनात सतनामसिंह गुलाटी, अशोक पवार, मंगला ठोंबरे, राहुल मगरे, संजय तगाटे, कल्याणराव देहाडे, सुशील भिसे, विजय काकडे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.