आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडी धरणातील गाळाला मागणीच नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - आटलेल्या धरणातील गाळ काढण्याला मिळणारा जबरदस्त प्रतिसाद लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाच्या वतीने नाथसागरातील गाळ काढण्याचा उपक्रम हाती घेतला. धरण झाल्यापासून एकदाही गाळ काढण्यात आला नसल्याने यास मोठा प्रतिसाद मिळेल हा प्रशासनाचा होरा खोटा ठरला. त्यामुळे गाळ उपशाचे ठिकाणही बदलण्यात आले असून शेतकर्‍यांनी मोफत गाळ घेऊन जावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी केले आहे.

गेल्या सोमवारपासून (1 एप्रिल) येथील गाळ काढण्यास सुरुवात झाली होती. यासाठी एका संघटनेने पोकलेन उपलब्ध करून दिले. शेतकर्‍यांनी आपापल्या वाहनांतून गाळ तेवढा न्यायचा आहे. ब्राrाणगावच्या बाजूने उपसा करण्यात येत होता. मात्र गेल्या सात दिवसांत येथून गाळ नेण्यास फारसे कुणी फिरकले नाही. त्यामुळे गाळ काढण्याची सामग्री तेथून लोहगावकडे हलवण्यात आली. रस्ता चांगला असल्याने येथे चांगला प्रतिसाद मिळेल, अशी जिल्हाधिकार्‍यांना अपेक्षा आहे.


काय आहे अपेक्षा?
गोदावरी काठावरील शेतकरी इतर भागांतील शेतकर्‍यांच्या तुलनेत काहीसे सधन आहेत. भविष्यात या गाळातून होणारा फायदा लक्षात घेता त्यांनी मोठय़ा प्रमाणावर गाळ नेणे अपेक्षित आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन फक्त आवाहन करू शकते.

काय आहेत कारणे?
हा गाळ वाहून नेण्यासाठी जास्त खर्च येतो. धरणातून बाहेर पडण्यासाठीच किमान पाच किलोमीटर लागतात.

असे आहे जिल्ह्यातील गाळ काढण्याचे चित्र
हर्सूल : काढलेला गाळ 20 हजार ब्रास- अपेक्षित 50 हजार ब्रास
सुखना : 5 हजार ब्रास, उद्दिष्ट 15 हजार ब्रास
बनगाव : 1 हजार ब्रास- उद्दिष्ट 5 हजार ब्रास
जायकवाडी : किमान 1 लाख ब्रास
मोफत साहित्य : 3 पोकलेन, 6 जेसीबी


नाथसागर आटल्यामुळे यातून गाळ नेण्याची शेतकर्‍यांना ही मोठी संधी आहे. यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकर्‍यांनी याचा लाभ घ्यावा. शेतकर्‍यांना सोयीचे असेल अशा ठिकाणी गाळाचा उपसा करण्याची आमची तयारी आहे. विक्रमकुमार, जिल्हाधिकारी