औरंगाबाद- हिरडपुरी,
आपेगावात पाणी न सोडल्यास धरणाचे दरवाजे उघडण्यात येतील, असा इशारा जायकवाडी संघर्ष समितीचे अध्यक्ष जयाजी सूर्यवंशी यांनी दिला. पैठण तालुक्यातल्या शेतकऱ्यांचे सोमवारपासून कडा कार्यालसमोर झोपा काढा आंदोलन सुरू आहे. दरम्यान, याबाबत शासन स्तरावरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती कडाचे अधीक्षक अभियंता एन. व्ही. शिंदे यांनी दिली.
प्रशासनाची मानसिकता नाही : आपेगाव आणि हिरडपुरी हे दोन्ही बंधारे कोरडे पडले आहेत. त्यामुळे बंधाऱ्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळणे अवघड बनले आहे. याबाबत शेतकरी संघटनेचे मराठवाडा प्रमुख कैलास तवार म्हणाले, सरकार बदलले असले, तरी प्रशासनाची मानसिकता बदलली नाही. त्यामुळे पाणी सोडले जात नाही.
प्रशासनाने 31 ऑक्टोबरपूर्वी पाण्याचे नियोजन करणे गरजेचे होते. मात्र, प्रशासन झोपा काढत असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पाणी मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार आहे. बुधवारपर्यंत प्रशासनाने निर्णय घेतला नाही, तर सर्व शेतकरी धरणाचे दरवाजे उघडतील, असा इशारा सूर्यवंशी यांनी दिला.
शासनाकडे प्रस्ताव सादर...
आपेगाव बंधा-यासाठी 7, तर हिरडपुरीसाठी 9 दलघमी पाणी लागते. हे बंधारे भरण्यासाठी जायकवाडीतून किमान 30 दलघमी पाणी सोडणे आवश्यक आहे. पाणी सोडण्याबाबत प्रकल्पात तरतूद नाही. ही बाब वरिष्ठांना कळवण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानंतरच निर्णय घेण्यात येईल. एन. व्ही. शिंदे, अधीक्षक अभियंता, कडा.