आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पन्नाशीच्या जायकवाडीमध्ये येणार १२.८४ टीएमसी पाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जायकवाडी धरणाला रविवारी ५० वर्षे पूर्ण होत असतानाच वरच्या धरणांतून १२.८४ टीएमसी पाणी त्यात सोडण्याचा निर्णय शनिवारी घेण्यात आला आहे. १५ ऑक्टोबरपर्यंतचा पाणीसाठा आणि खरिपाला झालेला पाणीवापराचा एकत्रित विचार करून हा निर्णय घेण्यात आला. येत्या ३१ ऑक्टोबरपूर्वी पोलिस बंदोबस्तात पाणी सोडले जाईल, अशी माहिती गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक च.आ.बिराजदार यांनी दिली.

तथापि, ३० टक्के अपव्यय पाहता ८ ते ९ टीएमसी पाणी जायकवाडीत पोहोचेल, असा अंदाजही बिराजदार यांनी व्यक्त केला आहे. जायकवाडीत सध्या ५.७३ टक्के पाणीसाठा आहे.
समन्यायी पाणीवाटपासंदर्भात गोदावरी पाटबंधारे मंडळाच्या कार्यालयात शनिवारी आढावा बैठक झाली.

कोठून किती पाणी येणार व अंतर किती
समूह : मुळा (मांड, ओहोळ, मुळा)
विसर्ग : १.७४ टीएमसी (४९.३८ दलघमी)
जायकवाडीपासून अंतर : ९० किमी
समूह : प्रवरा (भंडारदरा, निळवंडे, आढळा, भोजापूर आदी धरणे येतात.)
विसर्ग : ६.५० टीएमसी (१८४)
अंतर : भं.दरा २१२, निळवंडे १८६
समूह : गंगापूर (गंगापूर, काश्यपी, गौतमी)
विसर्ग : १.३६ टीएमसी (३८.३८ दलघमी)
अंतर : २७४ कि.मी.
समूह : दारणा (आळंदी, कडवा, भाम, भावली, वाकी, दारणा, मुकणे, वालदेवी)
विसर्ग : ३.२४ टीएमसी (९१.८७)
अंतर : २०५ कि.मी.
समूह : पालखेड : येथे केवळ २०३ दलघमी साठा आहे.
त्यामुळे पाणी सोडण्यात येणार नाही.

गतवर्षीपेक्षा ५.७३ टीएमसी पाणी जास्त
गतवर्षी ७ डिसेंबर रोजी वरच्या धरणांतून ७.११ टीएमसी पाणी सोडले गेले. त्यातील ४.९७ टीएमसी म्हणजे ६९ टक्के पाणी पोहोचले. कोरडे नदीपात्र, खड्डे असल्याने पाण्याचा अपव्यय होतो. आता ३० टक्के नासाडी गृहीत धरावी लागेल. ८ ते ९ टीएमसी पाणी नाथसागरात येण्याचा अंदाज आहे.
बंदोबस्तात विसर्ग
पोलिस बंदोबस्त मिळताच वरच्या धरणांतून पाणी सोडले जाणार अाहे. नदीपात्रातून पाणी अडवले जाऊ नये किंवा चोरी होऊ नये यासाठी बंदोबस्त ठेवला जाईल. त्यासाठी नगर, नाशिक जिल्ह्यांच्या हद्दीत कारवाई करण्याच्या सूचना पोलिस प्रशासनाला आहेत.

मोहरमनंतर मुहूर्त?
पाणी सोडताना पाण्याच्या मार्गावरील वीज बंद करावी लागणार आहे. तसेच वरच्या भागात होणारा विरोध पाहता पोलिस बंदोबस्त लागेल. त्यामुळे सध्या नवरात्र, दसरा, माेहरम या सणांमुळे बंदोबस्त मिळणार नाही. म्हणून मोहरमनंतर पाणी सोडले जाऊ शकते.

जायकवाडीची आज पन्नाशी
माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या पुढाकारातील पैठणच्या जायकवाडी प्रकल्पाला रविवारी (१८ ऑक्टोबर २०१५) रोजी ५० वर्षे पूर्ण झाली. १८ ऑक्टोबर १९६५ रोजी जायकवाडी प्रकल्पाचे भूमिपूजन लालबहादूर शास्त्री यांच्या हस्ते झाले होते.