आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jayakwadi Dam News In Marathi, Marathwada, Aurangabad, Divya Marathi

जायकवाडीचे पाणी राजकीय अजेंड्यावरून वगळले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मागील दोन वर्षांपासून जायकवाडीच्या पाण्याचा प्रश्न गाजत आहे. लोकसभेच्या निवडणुकीत हा मुद्दा कळीचा ठरणार असे वाटले होते, पण राजकारण्यांनी या प्रश्नाकडे डोळेझाक केली आहे. यामुळे लाखो लोकांच्या भावनांच्या अपेक्षांना येथे मुरड बसली आहे.


निवडणुकीत जनतेच्या प्रश्नांना बगल देत भावनेच्या आणि जातीच्या मुद्दय़ावर राजकारण होत असल्याने पाण्यासारखा गंभीर विषयही मागे पडला आहे. या विषयावर मोठय़ा प्रमाणात आंदोलने झाली. उमेदवार प्रचारात या मुद्दय़ावर मते मागतील, असे मतदारांना वाटत असतानाच प्रत्यक्षात मात्र या विषयावर सर्वपक्षीय मौन बाळगल्याचे चित्र समोर आले आहे.


सर्वपक्षीयांचे मौन : जायकवाडीच्या पाण्यावरून औरंगाबाद विरुद्ध अहमदनगर असा संघर्ष पेटला होता. युतीच्या नेत्यांकडून आघाडीच्या नेत्यांना टार्गेट करण्यात आले होते. त्यामुळे जायकवाडीत पाणी सोडा, अन्यथा निवडणुकीत त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना इशारा दिला होता. जनतेचे प्रश्न वेशीवर टांगून उमेदवार धार्मिक आणि भावनिक मुद्दे पुढे करत आहेत. खर्‍या अर्थाने सर्वपक्षीय उमेदवारांनी पाणी प्रश्नावर मौन धारण केले आहे.


विकासाच्या मुद्दय़ापेक्षा भावनेवर राजकारण : निवडणुकीची गणिते ही जातीय राजकारणावर अवलंबून असतात. त्यामुळे मतदान जवळ आले की सुरक्षेच्या मुद्दय़ावर राजकारण तापवले जाते. या निवडणुकीतही त्याचा प्रत्यय पाहायला मिळतो. याबाबत जलतज्ज्ञ विजय दिवाण म्हणाले, जायकवाडीचा विषय लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दा ठरायला हवा होता. नदी खोर्‍यातील पाण्याचे वाटप करणारी यंत्रणा लवादाकडून केली जाते. हे निर्णय केंद्र स्तरावरून होतात. त्यामुळे या विषयाचे आकलन असणारा लोकप्रतिनिधी असायला पाहिजे.


जिव्हाळ्याचे मुद्दे मागे पडले : काँग्रेस विकासाच्या मुद्दय़ावर निवडणूक लढवत असल्याचे पक्षाचे सरचिटणीस अरुण मुगदिया यांनी सांगितले. मात्र, निवडणूक जातीय आणि धार्मिक मुद्दय़ावर लढवली जात असल्यामुळे लोकांचे मुद्दे मागे पडले आहेत. राजकीय अभ्यासक प्रा. जयदेव डोळे यांनी लोकसभेपेक्षा विधानसभेत हा मुद्दा अधिक गाजेल, असे मत व्यक्त केले.


सरकारची विरोधी भूमिका : शिवसेनेने जायकवाडीच्या हक्काच्या पाण्यासाठी सातत्याने संघर्ष केला. सर्वोच्च न्यायालयातही राज्य सरकारने मराठवाड्याच्या विरोधी भूमिका घेतली होती, असे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.


समन्यायी पाणी वाटप हवे
पाण्याच्या संदर्भात ‘आप’ने समन्यायी पाणी वाटप व्हावे, अशी भूमिका घेतली आहे. ग्रामीण भागात जायकवाडीच्या मुद्दय़ावर चर्चा होत आहे. मराठवाड्यात, विशेषत: औरंगाबादमध्ये धार्मिकतेला प्राधान्य दिल्यामुळे या विषयावर चर्चा होत नाही, असे आम आदमी पार्टीचे उमेदवार सुभाष लोमटे यांनी म्हटले.