आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीत आवक सुरू, नांदूर-मधमेश्वर धरणातून पुन्हा पाणी सोडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण - जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू झाल्यामुळे नांदूर-मधमेश्वर धरणातून पुन्हा पाणी सोडण्यात आले, परंतु वरील धरणे ओव्हरफ्लो झाल्यानंतरच जायकवाडीत पाणी सोडले जात असल्याने धरणाची पाणीपातळी फारशी वाढत नाही.
सध्या जायकवाडीत 31 टक्के पाणी आहे. दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने तेथील धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यामुळे शनिवारी पहाटे नांदूर-मधमेश्वरमधून 3 हजार 155 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. याशिवाय टाकळी धरणातून सोडलेले 3 हजार क्युसेक्सपाणी गोदापात्रात सोडण्यात आले असून ते दोन दिवसांत जायकवाडीत दाखल होईल.

...तर जायकवाडी भरले असते
पाणी वाटपाच्या नियमाप्रमाणे पाणी सोडले असते तर आतापर्यंत जायकवाडी धरण भरले असते. पाणीवाटपाच्या नियमाप्रमाणे 15 ऑक्टोबरपूर्वी जायकवाडीच्या वरील भागातील धरणात 82 टक्क्यांपेक्षा अधिक पाणी साठवता येत नाही. मात्र, वरील सर्वच धरणे एक महिन्यापूर्वीच शंभर टक्के भरली असतानाही, नियम डावलून ओव्हरफ्लोच्या पाण्याशिवाय अन्य पाणी जायकवाडीसाठी सोडण्यात आले नाही.

वरील धरणांची टक्केवारी
करंजवण - 100 टक्के, गंगापूर - 99.12 टक्के, दारणा - 100 टक्के, भंडारदरा - 100 टक्के, ओझरखेड - 72.97 टक्के, पालखेड - 100 टक्के, मुळा - 83.42 टक्के, नांदूर- मधमेश्वर - 96.49 टक्के, निळवंडे- 100 टक्के. असे असले तरी जायकवाडीच्या साठ्यातील वाढ केवळ ओव्हरफ्लोच्या पाण्यावर झालेली आहे.