आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीचे १८ टीएमसी पाणी वाचले, जायकवाडीत आले ५० दलघमी पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - परतीच्या पावसामुळे परभणी, बीड, जालना जिल्ह्यांसह औरंगाबादकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. जायकवाडीच्या पाणी वाटप नियोजनातही बदल झाला आहे. या पावसामुळे परळी औष्णिक विद्युत केंद्र, माजलगाव, खरीप आणि बंधाऱ्यासाठी पाणी सोडण्याची गरजही उरली नाही. त्यामुळे जायकवाडीतून सोडण्यात येणाऱ्या १८.५१ टीएमसी पाण्याची बचत झाली आहे. यातून रब्बीसाठी किमान चार ते पाच पाळ्या देण्यात येणार आहेत. दरम्यान, नांदूर-मधमेश्वरमधून रविवारी सकाळपासूनच पाणी सोडण्यात येत असल्यामुळे जायकवाडीच्या पाणीसाठ्यात वाढ होत असून पाणीसाठा ७० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये ३० ऑगस्टला जायकवाडीच्या पाण्याचे नियोजन ठरले होते. त्यानुसार माजलगाव आणि परळीला थर्मलसाठी पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता. मात्र आता परतीच्या पावसामुळे या नियोजनात बदल झाल्याची माहिती कडाच्या सूत्रांनी दिली. माजलगावसाठी जायकवाडीतून १३२ दलघमी पाणी सोडले जाणार होते. सप्टेंबरपासून पाणी सोडण्यास सुरुवात झाल्यानंतर उजव्या कालव्यातून २३ दलघमी पाणी सोडले गेले. मात्र माजलगावमध्ये झालेल्या अतिवृष्टीत धरण एकाच दिवसात भरले. त्यामुळे जायकवाडीतून पाणी सोडणे शनिवारपासूनच थांबवले. परळी थर्मलसाठी ६८ दलघमी पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता. त्यापैकी १६ दलघमी सोडण्यात आले. पुढच्या टप्प्यात अाणखी पाणी सोडण्याचे कडाचे नियोजन होते. मात्र माजलगाव धरणातूनच परळीला पाणी देण्यात येणार आहे. खरिपासाठी २५० दलघमी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता. आता त्याचीही गरज उरली नाही. गोदावरीच्या बंधाऱ्यासाठी टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन होते. मात्र हे बंधारे भरल्यामुळे १८.५१ टीएमसी पाणी वाचले. औरंगाबाद शहरासाठी दररोज १५० एमएलडी तर वर्षाकाठी साधारण दोन टीएमसी पाणी लागते. गेल्या वर्षी जायकवाडी धरण मृत साठ्यात गेल्यामुळे उद्योगांची पाणी कपात करावी लागली होती. मात्र आता दोन वर्षे तरी शहर आणि उद्योगाला पाण्याची चिंता नाही.

जायकवाडीचे १८ टीएमसी पाणी वाचले
औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जायकवाडीत २४ तासांत २९.७५ दलघमी पाण्याची आवक झाली. रविवारी सकाळपासून नांदूर-मधमेश्वरमधून १३५३० क्युसेक पाणी सोडण्यात येत होते. संध्याकाळी सहा वाजता विसर्ग ४४६९ पर्यंत कमी झाला. त्यामुळे दिवसभरात १८ दलघमी पाण्याची आवक झाली. रात्री आठपर्यंत एकूण पाणीसाठा २२५२ दलघमी आणि उपयुक्त पाणीसाठा १५१४ दलघमी इतका होता. हे प्रमाण ६९.७४ इतके आहे.
बातम्या आणखी आहेत...