आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jayakwadi Dam Water Issue Supreme Court Decision

जायकवाडीत पाणी सोडण्यास सुप्रीम कोर्टाची स्थगिती

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/ औरंगाबाद- मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार भंडारदरा, मुळा आणि निळवंडी या धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास सुप्रीम कोर्टाने बुधवारी स्थगिती दिली. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा आदेश येताच भंडारदरा, मुळा आणि निळवंडी धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे.

जायकवाडीला जाणा-या पाण्याचा वेग तीन तासाला एक किलोमीटर इतका कमी आहे. त्यामुळे जायकवाडीत पाणी पोहोचण्याची शक्यता नाही, असे राज्याच्या पाटबंधारे खात्याने स्पष्ट केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती दिली.

भर उन्हाळ्यात नदीचे पात्र शुष्क झाल्याने पाण्याचा वेग मंदावला आहे. पाण्याचा वेग मंद असल्याने ते जायकवाडीत पोहोचण्याची शक्यता नाही, असा अहवाल पाटबंधारे विभागाने सरकारकडे सोपवला होता. सरकारच्या अहवाल तपासूनच सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.

दरम्यान, जायकवाडी धरणात जुलैपर्यंत पुरेल इतका पिण्याच्या पाण्याचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील धरणांतून पाणी सोडण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती राज्य शासनाच्या वतीने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली होती. याबाबत शासनाने प्रतिज्ञापत्र सादर करावे, असेही आदेश न्यायालयाने दिले होते. न्यायालयाच्या आदेशामुळे महापालिकेला काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी जायकवाडीसाठी दररोज 17 दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नगर शहरात गंभीर पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

मुळा धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाविरोधात महापालिकेच्या वतीने महापौर शीला शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कायदेतज्ज्ञ शिवाजी जाधव व व्ही. एस. बेंद्रे यांच्यामार्फत महापौरांनी आपले म्हणणे सादर केले होते. महापौरांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने राज्य शासन, मराठवाडा विकास परिषद, जलसिंचन विभाग, नाशिक व औरंगाबाद महापालिका यांना म्हणणे सादर करण्यासाठी नोटिसा बजावल्या होत्या. यासंदर्भात मंगळवारी झालेल्या सुनावणीत राज्य शासनाच्या वतीने म्हणणे सादर करण्यात आले. त्यात जायकवाडी धरणात जुलै 2013 पर्यंत पिण्याच्या पाण्याचा साठा उपलब्ध असून नगर जिल्ह्यातील धरणांतून पाणी सोडण्याची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आले. त्यावर न्यायालयाने शासनाला तसे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.

मुळा धरणातून दररोज 17 दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याने दहा दिवसांत अवघे 32 किलोमीटरचे अंतर कापले असून मंगळवारी पाणी खेडले परमानंद (ता. नेवासे) गावापर्यंत पोहोचले होते. खेडले परमानंदपासून प्रवरासंगमपर्यंत आणखी 40 किलोमीटरचे अंतर पाण्याला पार करायचे आहे. त्यासाठी आणखी 20 दिवस लागणार आहेत. नगरसह नाशिक व औरंगाबाद जिल्ह्याचे लक्ष सर्वोच्चच्या निर्णयाकडे लागले होते.