आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीची पातळी आली 14 टक्क्यांवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण - उन्हाची तीव्रता वाढल्याने मागील वर्षीच्या तुलनेत बाष्पीभवन होण्याचे प्रमाण वाढले असून यामुळे जायकवाडी धरणाचा जलसाठा 14 टक्क्यांवर आला आहे.

मागील वर्षीच्या भीषण दुष्काळानंतर यंदा धरणात पुरेसा पाणीसाठा राहील, याची दक्षता पाटबंधारे विभागाने उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच घेतली. त्यामुळे सध्या धरणात पावसाळ्यापर्यंत पाणी टिकेल एवढा साठा शिल्लक आहे. मात्र, सध्या दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पाण्याचे बाष्पीभवनही वाढत आहे. नेहमीच्या तुलनेत यंदा बाष्पीभवनाची तीव्रता अधिक आहे. दररोज बाष्पीभवनामुळे 1 दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. मागील वर्षीपेक्षा हे प्रमाण वाढले असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले आहे.
पाटबंधारे विभागाने धरणात आहे तेवढे पाणी पिण्यास पुरेल, शिवाय सिंचनालाही पाणी देता येईल याचे नियोजन केल्याचा दावा केला आहे. डाव्या कालव्यातून शेतीसाठी दुसरी पाणी पाळी द्यावी, असा प्रस्ताव शासनाला महिनाभरापूर्वी दिला आहे. मात्र, शासनाने अद्याप या प्रस्तावासंदर्भात पाटबंधारे विभागाला कळवले नसल्याने आहे ते पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवण्याचा शासनाचा विचार आहे. त्यामुळे सिंचनासाठी आणखी पाणी मिळेलच याची खात्री पाटबंधारे विभागाला नाही.

- मागील वर्षी याच महिन्यात धरणाची पाणीपातळी केवळ 1 टक्का होती. त्यानंतर इतर धरणांतून पाणी सोडल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला होता.
- सध्या धरणात 14 टक्के पाणीसाठा असून यामध्ये पिण्याचे पाणी व सिंचनासाठीही पाणी देता येईल. - अशोक तिवारी, उपकार्यकारी अभियंता