आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुलैअखेर उद्योगांचे पाणी 20 टक्क्यांनी कापणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - जायकवाडी धरणात सध्या केवळ साडेतीन टक्के पाणीसाठा शिल्लक असून हे पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. दरम्यान, पावसाने दडी मारल्यास जुलैअखेर औरंगाबाद, जालना, पैठणसह परिसरातील चार हजार उद्योगांचा पाणीपुरवठा 20 टक्क्यांनी कमी केला जाणार आहे.

जून महिना संपला, तरी पावसाने हजेरी न लावल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. औरंगाबादसह चार जिल्ह्यांतील नागरिकांना व उद्योगांना पाणी पुरवणार्‍या जायकवाडी धरणातील पाणीपातळी झपाट्याने खालावली आहे. सध्या धरणात केवळ साडेतीन टक्के पाणीसाठा उरला असून तो पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. दरम्यान, उद्योगांच्या पाणी कपातीबाबत आठ दिवसांत निर्णय घेतला जाणार असल्याने उद्योजकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

जायकवाडी धरणातून उद्योगांना दररोज 50.5 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता यात 10 एमएलडीची कपात केली जाणार आहे. पाणी कपातीची सर्वाधिक झळ औरंगाबाद, चिकलठाणा, वाळूज, जालना, पैठण, शेंद्रा परिसरातील उद्योगांना बसणार आहे. पाणी कपातीमुळे इंजिनिअरिंग, रबर, प्लास्टिक, फार्मा केमिकल, बिअर कंपन्या, पेंट शॉप, पावडर कोटिंग आदी उद्योगांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे.

बेरोजगारी वाढण्याची शक्यता : उद्योग वसाहतींच्या पाणीपुरवठ्यात कपात होणार असल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे. यामुळे कंपन्यांमध्ये कार्यरत असणार्‍या जवळपास अडीच लाख कर्मचार्‍यांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एमआयडीसीला होणारा पाणीपुरवठा
वाळूज - 35 एमएलडी, चिकलठाणा - 8 एमएलडी, रेल्वेस्टेशन - 1.5 एमएलडी, शेंद्रा - 5.25 एमएलडी, जालना - 0.80 एमएलडी

पाणी कपातीची वाच्यता करू नका
उद्योगांची पाणी कपात या महिनाअखेरपर्यंत होणार असून त्याची वाच्यता करू नका, अशा सूचना शासनाने एमआयडीसीच्या पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांना केल्या असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
- सध्या धरणातील पाणीसाठा पाहता आठ दिवसांत पाऊस झाला नाही, तर जुलैअखेरपर्यंत उद्योगांच्या पाणी कपातीचा निर्णय घेतला जाईल.
आर. व्ही. नवाळे, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी
- जायकवाडी धरणामधील पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवल्याने उद्योगांच्या पाणीपुरवठ्यात काही दिवसांत कपात करावी लागेल.- संजय भर्गोदेव, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग

(फोटो - जायकवाडी धरणातील पाणीसाठा)