आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडी 81% भरले, कोणत्याही क्षणी दरवाजे उघडणार; गोदाकाठच्या गावांना इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जायकवाडी धरणात शनिवारी संध्याकाळपर्यंत ८१ टक्के, तर  वरच्या भागातील सर्व धरणांत ९० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. हवामान खात्याने आगामी काळात पावसाचा अंदाजही वर्तवला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील व वरच्या भागातील धरणातून विसर्ग झाल्यास जायकवाडी धरणातून पाणी सोडावे लागणार आहे. यासाठी पूर्वतयारी म्हणून औरंगाबाद, जालना, परभणी, बीड आणि नांदेड जिल्ह्यांतील गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  महसूल उपायुक्त प्रल्हाद कचरे यांनी यासंबंधीचे पत्र या पाचही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे. संबंधित गावांत पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून ही दक्षता घेण्यात आली आहे. यापूर्वी सन २००६ मध्ये जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. 

- वरच्या भागातील दारणा, भावली, भंडारदरा, वाघाड, ओझरवेअर ही धरणे शंभर टक्के भरली.
- दारणामध्ये ९७ टक्के, निळवंडे ९५ टक्के, गंगापूर ९३ टक्के, पालखेड ७९ टक्के, मुळा ८३ टक्के गौतमी ९७, मुकणे ७८ टक्के पाणीसाठा.
- आगामी काळात या परिसरात पाऊस झाल्यास या प्रकल्पांतून विसर्ग वाढण्याची शक्यता पाहता गोदाकाठच्या गावांत प्रशासनाने पूर्वतयारी करण्याचे आदेश.

विभागात अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा
मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांत सर्वाधिक ४५ टक्के  पाणीसाठा झाला. गेल्या वर्षी हाच पाणीसाठा या काळात ४० टक्के होता. तर लघु प्रकल्पांत सध्या केवळ २५ टक्केच पाणीसाठा आहे. हे प्रकल्प भरण्याच्या दृष्टीने अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. 

१७४० दलघमी उपयुक्त साठा
जायकवाडी धरणात सुमारे ८१% साठा आहे. त्यापैकी  १७४० दलघमी उपयुक्त साठा आहे. जायकवाडीत सध्या ४४८५ क्युसेक आवक होत आहे. नांदूर-मधमेश्वरमधून ३१५५, दारणा ११००, भंडारदरा १११९, निळवंडे १०८१, ओझरवेअर ४५७, कडवा प्रकल्पातून ४२४ क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वरच्या भागात अधिक पाऊस झाल्यास जायकवाडीतून पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते.

येलदरी, ऊर्ध्व पैनगंगा १० टक्क्यांच्या आत
मराठवाड्यातील येलदरी आणि ऊर्ध्व पैनगंगातील पाणीसाठा १० टक्क्यांपेक्षा कमी आहे.  येलदरीत ३५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा असून हे प्रमाण ४.४४ टक्के आहे. ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पात  ६६ दलघमी उपयुक्त पाणीसाठा असून हे प्रमाण ७ टक्के आहे. माजलगाव धरणात ६८ दलघमी तर दुधना धरणात १३१ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे.
बातम्या आणखी आहेत...